रत्नागिरी वायुगळती दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन

रत्नागिरी, 13 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड येथील जिंदाल कंपनीत झालेल्या वायुगळतीमुळे 69 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्याचे माजी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या दुर्घटनेची दखल घेतली आहे. उदय सामंत यांनी आज (दि.13) रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन तेथे उपचार घेत असलेल्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी या घटनेची सखोल चौकशी करण्याच्या सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

https://x.com/samant_uday/status/1867503014505861352?t=02ge1FNAG8u8SrpazVKbuA&s=19

69 विद्यार्थी आणि एक महिला बाधित

या वायुगळतीच्या घटनेत 69 मुले आणि मुली आणि एक महिला बाधित झाले असल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली. या विद्यार्थ्यांवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये सिव्हिल हॉस्पिटलच्या लहान मुलांच्या वॉर्डमध्ये 22 विद्यार्थ्यांना ऍडमिट करण्यात आले आहे. याबरोबरच नवीन वॉर्डमध्ये 23 विद्यार्थी, महिला शस्त्रक्रिया विभागात 14 विद्यार्थी आणि अतिदक्षता विभागात 1 विद्यार्थिनी यांना ऍडमिट करण्यात आले आहे. तर परकार हॉस्पिटलमध्ये 8 विद्यार्थ्यांना ऍडमिट करण्यात आले आहे. या सर्व रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा झालेली आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

https://x.com/samant_uday/status/1867531023921426892?t=rRZHY3ENF5xxS4KCGH2dVg&s=19

आठ दिवसांत समितीचा अहवाल

या वायुगळतीची सखोल चौकशी केली जाईल. तसेच याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. या प्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या आठ दिवसांत या समितीचा अहवाल येईल, त्यानंतर दुर्घटनेचे खरे कारण समोर येईल. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली. हा जो प्रकार घडला आहे तो अतिशय दुदैवी आहे. हा प्रकार निष्काळजीपणा मुळे घडला आहे. कंपनीने याची काळजी आधीच घेणे अपेक्षित होते. तर जिंदाल कंपनीला गॅस मेंटेनन्स प्रकल्प बंद करण्यास सांगितले आहे, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

कंपनीने नुकसानभरपाई द्यावी

या घटनेसंदर्भात कंपनीच्या मालकाने खुलासा करावा. ही घटना या कंपनीच्या निष्काळजीपणा मुळे घडली आहे. त्यामुळे या कंपनीने बाधित झालेल्या रुग्णांना नुकसानभरपाई दिली पाहिजे, अशा सूचना जिंदाल कंपनीला दिल्या आहेत, असे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी देखील ही समिती आपला अहवाल देईल, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *