बारामतीतील दुसऱ्या गॅस दहनीच्या कामाला सुरुवात

बारामती, 21 मेः बारामती नगर परिषद हद्दीतील जळोची क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत येणाऱ्या स्मशान भूमीत दुसरी गॅस दहनी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली आहे. जळोची स्मशान भूमीत आज, शनिवारी 21 मे 2022 रोजी गॅस दहनीच्या चिमणी उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. सदर गॅस दहनीची चिमणी ही 200 फूट आहे. सध्या या गॅस दहनीच्या चिमणी बसवण्याचे काम हे बारामती नगर परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे.

कोरोना काळात बारामती शहर, तालुक्यासह परिसरातील रुग्णांची मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती.  त्या मृतांवर अंत्यविधीसाठी शहरी वस्तीपासून दूर असे ठिकाण म्हणून नगर परिषद हद्दीतील जळोची स्मशान भूमीची निवड करण्यात आली. सदर स्मशान भूमीत आता पर्यंत तब्बल हजारच्या घरात मृत कोविड रुग्णांचा अंत्यविधी करण्यात आला आहे. पूर्वी या स्मशान भूमीत अंत्यविधीसाठी तीनच बेड उपलब्ध होते. मात्र वाढता मृत्यू दर लक्षात घेत देणगीतून स्मशान भूमीत आणखीन अंत्यविधीचे बेड वाढविण्यात आले.

एका मृतदेहावर अंत्यविधी करण्यासाठी 8 ते 10 माण लाकडाची गरज भासते. एक वेळ अशी आली की, मृत कोविड रुग्णांवर अंत्यविधी करण्यासाठी लाकडांचा तुटवडा जाणवू लागला. तसेच अंत्यविधीसाठी लाकडाचा वापर केल्याने पर्यावरण हानी तर होतेच तसेच वायू प्रदूषण देखील वाढते. तसेच मृत कोविड रुग्णांचा अंत्यविधी करताना बाहेर पडणाऱ्या दुर व उडणाऱ्या राखेमुळे नागरीकांमध्ये थोड्या फार प्रमाणात भीती असायची. यामुळे नगर परिषदेने सदर स्मशान भूमीत गॅस दहनीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला. गॅस दहनी हा पर्यवरणपूरक प्रकल्प असून एका मृतदेहावर अंत्यविधी करण्यासाठी एक ते दोन सिलेंडरचा वापर होतो. यामुळे बारामती नगर परिषदेने गॅस दहनीचा  प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून दिला.

सदर प्रकल्पाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असून याला जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी मिळाला आहे. सदर गॅस दहनीसाठी 75 लाख आणि सिव्हिल वर्क 35 लाख असे मिळून तब्बल 1 कोटी 5 लाखांच्या घरात बजेट आहे. सध्या या गॅस दहनी प्रकल्पाचे कामाला सुरुवात झाली असून याचाच एक भाग म्हणून आज, गॅस दहनीची चिमणी उभारण्यात आली. तसेच बारामती नगर परिषदेने याआधी शहरातील कसबा पुलाच्या अलीकडील भागातील स्मशान भूमीत असाच गॅस दहनी प्रकल्प उभारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *