पंजाब, 02 जून: (विश्वजीत खाटमोडे) पंजाबच्या फतेहगड साहिब येथील सरहिंद रेल्वे स्थानकावर मोठी दुर्घटना घडली. याठिकाणी रेल्वेच्या दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्या. या अपघातात मालगाडीचे इंजिन उलटले. या अपघातात रेल्वेचे दोन्ही चालक जखमी झाले आहेत. विकास कुमार आणि हिमांशू कुमार असे या जखमी झालेल्या चालकांची नावे आहेत. हे दोघे उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील रहिवासी आहेत. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. अशी माहिती सरकारी रेल्वे पोलीस अधिकाऱ्याने दिली.
https://twitter.com/ANI/status/1797109528510509235?s=19
https://twitter.com/ANI/status/1797115446782742918?s=19
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. जखमींना सध्या पटियाला येथील राजिंद्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. याठिकाणी या दोन्ही रेल्वे चालकांवर उपचार करण्यात येत आहेत, याची माहिती फतेहगढ साहिबच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉ. इवानप्रीत कौर यांनी दिली आहे. तर या अपघाताचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये रेल्वेंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसत आहे. या फोटोवरून गाड्यांची स्थिती पाहता ही टक्कर किती भीषण होती, याचा अंदाज येऊ शकतो.
असा झाला अपघात
दरम्यान, सरहिंद रेल्वे स्थानकावर आधीच उभ्या असलेल्या कोळशाच्या मालगाडीला दुसऱ्या मालगाडीने पाठीमागून धडक दिल्याने हा अपघात झाला. त्यानंतर मालगाडीचे इंजिन उलटले. या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी जखमी चालकांना बाहेर काढून त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. तर हा अपघात कशामुळे झाला? याचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.