पुणे, 09 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडी परतली आहे. राज्याच्या अनेक भागांत रात्रीपासून हवेत गारवा निर्माण झाला आहे. तसेच सकाळच्या वेळेस देखील राज्यातील अनेक ठिकाणी दाट धुके पहायला मिळाले आहेत. मागील काही दिवसांपासून राज्यात स्वच्छ सूर्यप्रकाश पडत आहे. त्यामुळे पुन्हा थंडीचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने येत्या काही दिवसांत राज्यातील थंडीच्या वातावरणात वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांना थंडी पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे.
https://x.com/Hosalikar_KS/status/1865971378966409421?t=U1W02s3bIN6FmL9N2h1XuQ&s=19
थंडी वाढणार!
तत्पूर्वी, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या फेंगल चक्रीवादळाच्या प्रभावाने गेल्या आठवड्यापासून राज्यातील थंडी गायब झाली होती. त्यामुळे राज्यातील तापमानात वाढ झाली होती. त्यावेळी हवामान विभागाने राज्यात पावसाचा अंदाजही वर्तवला होता. त्यादरम्यान राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मात्र, फेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपल्याने आता महाराष्ट्रात रात्रीपासून थंडीचा जोर वाढला असल्याचे दिसत आहे. थंडी जाणवू लागल्याने सकाळपासून रस्त्यांवर शेकोट्या पेटवण्यास सुरूवात झाली आहे. तसेच सकाळी मोर्निग वॉकला जाताना लोक स्वेटर, पायमोजे, हातमोजे, टोपी यांसारखे गरम कपडे घालून आल्याचे पहायला मिळाले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या आठवड्यात राज्यातील तापमानात हळूहळू घट होणार आहे. त्यामुळे नागरिकांना पुढील काही दिवसांत थंडीचा आनंद घेता येणार आहे.
पुण्यातही थंडीचे वातावरण
पुणे शहर आणि जिल्ह्यातील अनेक ठिकाणी देखील आज थंडी जाणवू लागली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यातील तापमानात सध्या किंचित घट झाली आहे. येत्या काही दिवसांत येथील तापमानात घट होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पुणे शहरातील मागरपट्टा परिसरात आज (दि.09) 18.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच चिंचवड येथे 16.9 अंश सेल्सिअस, वडगाव शेरी 18.1 अंश सेल्सिअस, कोरेगाव पार्क 16.8 अंश सेल्सिअस, लवळे 16.8 अंश सेल्सिअस, दापोडी 15 अंश सेल्सिअस, पाषाण 12.4 अंश सेल्सिअस, लवासा 12.2 अंश सेल्सिअस, शिवाजीनगर 12 अंश सेल्सिअस, लोणावळा 10.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात आज (दि.09) सकाळी 15.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच इंदापूर तालुक्यात 16.2 अंश सेल्सिअस, भोर 14.7 अंश सेल्सिअस, पुरंदर 14.3 अंश सेल्सिअस, खेड 13.9 अंश सेल्सिअस, दौंड 13.3 अंश सेल्सिअस, आंबेगाव 13.8 अंश सेल्सिअस, हवेली तालुक्यात 11.3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिली आहे.