मुंबई, 26 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा कालावधी देखील समाप्त झाला आहे. या संदर्भातील आदेश निवडणूक आयोगाने जारी केले आहे. याचे पत्र भारतीय निवडणूक आयोगाने राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पाठवले आहे. त्यानुसार, महाराष्ट्रातील आचारसंहिता आता शिथिल झाली आहे. दरम्यान, राज्यात 15 ऑक्टोंबर 2024 रोजी विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्याचवेळी राज्यात आचारसंहिता लागू झाली होती.
https://x.com/MahaChiefSec/status/1861032577991393541?t=vpZ4ynyp4t36sEqK2kepZQ&s=19
विकासकामांना गती मिळणार
निवडणुकीची आचारसंहिता शिथील झाल्यामुळे आता रखडलेली सर्व विकासकामे कामे आणि शासकीय योजना पुन्हा एकदा सुरू होऊ शकणार आहेत. दरम्यान, यावर्षी देशात लोकसभेच्या देखील निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीसाठी देशात मार्च ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत आचारसंहिता होती. त्यानंतर राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होती. आचारसंहिता लागू झाल्यामुळे अनेक ठिकाणच्या विकासकामांबाबत प्रशासनाला निर्णय घेता येत नव्हते. मात्र आता आचारसंहितेचा कालावधी समाप्त झाल्यामुळे राज्यातील अनेक विकासकामांना गती येणार आहे.
आचारसंहितेच्या काळात करोडोंची बेकायदा मालमत्ता जप्त
दरम्यान, राज्यात यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी 706 कोटींहून अधिक रुपयांची बेकायदा मालमत्ता जप्त केली होती. यामध्ये बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, सोने चांदी यांसारख्या मौल्यवान धातू आदींचा समावेश आहे. ही कारवाई 15 ऑक्टोंबरपासून करण्यात आली आहे. याची माहिती राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.