मुंबई, 15 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात आता 2024 च्या विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. राज्यात यंदाची विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात आयोजित करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर त्याची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होईल. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास 22 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. उमेदवारी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. उमेदवारी अर्जाची छाननी 30 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत 4 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे, याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. दरम्यान, यासोबतच राज्यात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहितेच्या काळातील नियमावलीची माहिती आपण पुढे घेणार आहोत.
आचारसंहिता म्हणजे काय?
निवडणूका निष्पक्षपातीपणे पार पडाव्यात, यासाठी निवडणूक आयोगाने केलेल्या नियमावलीला आचारसंहिता म्हटले जाते. या नियमावलीचे पालन करणे सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना बंधनकारक असते. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीची प्रकिया पार पडेपर्यंत आचारसंहिता लागू असते. तर आचारसंहितेचा भंग केल्यास संबंधित उमेदवार किंवा राजकीय पक्षांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे.
राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी काय करावे?
1) निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वी सुरू करण्यात आलेले कार्यक्रम पुढे सुरू ठेवता येतील.
2) पूर, अतिवृष्टी इ. नैसर्गिक आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रातील जनतेसाठी मदतीचे काम सुरू ठेवता येणार आहे.
3) मरणासन्न किंवा गंभीररीत्या आजारी असलेल्या व्यक्तींना रोख रकमेची किंवा इतर वैद्यकीय मदत करता येईल.
4) इतर राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्यावरील टीका ही त्यांची धोरणे, पूर्वीची कामगिरी आणि कामाशीच संबंधित असावी.
5) स्थानिक पोलीस प्राधिकाऱ्यांना प्रस्तावित सभांची जागा आणि वेळ याबाबत पुरेशी आगाऊ सूचना देऊन आवश्यक ती परवानगी घेतलेली असावी.
6) सभांमध्ये अडथळे आणणाऱ्या, सुव्यवस्था बिघडवणाऱ्या व्यक्तींचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी.
7) प्रस्तावित सभेसाठी ध्वनिवर्धक किंवा इतर सुविधांचा वापर करण्याची परवानगी मिळवावी आणि ते वापरण्याच्या नियमांचे पालन करावे.
काय करू नये
1) सत्ताधारी पक्षाला सरकारने केलेल्या कामगिरीविषयी सरकारी राज्यकोषातील खर्चाने कोणतीही जाहिरात करण्यास प्रतिबंध आहे.
2) उमेदवार आणि मतदानासाठी आलेला मतदार यांच्याशिवाय इतर कोणत्याही मंत्र्याला मतदान कक्षात किंवा मतमोजणीच्या ठिकाणी मतदार या नात्याने असल्याखेरीज प्रवेश करता येणार नाही.
3) आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारला कोणतीही घोषणा किंवा कसलाही शासकीय निर्णय घेता येत नाही. याशिवाय विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण, उद्घाटन यासारखे कार्यक्रम देखील करता येत नाही.
4) सरकारला कोणत्याही शासकीय अधिकाऱ्यांची किंवा कर्मचाऱ्याची बदली करता येत नाही.
5) निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जातीधर्मावरून समाजात तेढ निर्माण होईल, अशी कृती करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
6) देऊळ, मशिदी, चर्च, गुरूद्वार किंवा इतर कोणतेही प्रार्थनास्थळ यांचा वापर निवडणूक प्रचाराची भाषणे, प्रचार फलक, संगीत यांच्यासाठी करू नये.
7) आचारसंहिता लागू झाल्यानंतर मतदारांना आकर्षित करण्यासाठी पैसे, दारू किंवा कोणत्याही प्रकारची भेटवस्तू देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
8) मतदारांना आमिष दाखवणे किंवा धमकी देणे अशा गोष्टी आचारसंहितेचा भंग करणारे ठरते.
9) मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत प्रचार करणे, मतदान समाप्त करण्यासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या आधीच्या 48 तासांत सार्वजनिक सभा घेणे आणि मतदारांची मतदान केंद्रावर नेण्या आणण्यासाठी वाहनाची व्यवस्था करणे यांसारख्या गोष्टी करण्यास मनाई करण्यात आली आहे.
10) इतर पक्षांनी व उमेदवारांनी लावलेली पत्रके काढून टाकू नयेत किंवा ती विद्रुप करू नयेत.
11) मतदानाच्या दिवशी ओळखचिठ्ठया वाटपाच्या ठिकाणी किंवा मतदान कक्षाजवळ पत्रके, ध्वज, चिन्हे आणि इतर प्रचार साहित्याचे प्रदर्शन करू नये किंवा असे साहित्य त्या ठिकाणी लावू नये.