मुंबई, 04 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी सरकारकडून “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. परंतु, या योजनेसंदर्भातील एक प्रकरण सध्या चर्चेत प्रचंड चर्चेत आहे. धुळे जिल्ह्यातील लाभार्थी महिला भिकुवाई प्रकाश खैरनार यांनी या योजनेचा लाभ घेतला, परंतु त्यांची लाभ रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याऐवजी त्यांच्या मुलाच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा झाली. त्यामुळे भिकुवाई खैरनार यांनी स्वतःहून लाभाची रक्कम सरकारकडे जमा करण्यासाठी तसेच लाभाची रक्कम बंद करण्यासाठी अर्ज केला होता. त्यानुसार या महिलेने लाभाची रक्कम शुक्रवारी (दि.03) शासनाच्या खात्यात चलनाद्वारे जमा केली आहे.
https://x.com/iAditiTatkare/status/1875467226721214522?t=FKxoTQk2u0nOGFcNfqjmvQ&s=19
मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या?
परंतू, या प्रकरणामुळे आज सकाळपासूनच उलट सुलट बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. यामध्ये सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील लाभार्थ्यांकडून पैसे परत घेत असल्याचे बोलले जात होते. यासंदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. धुळ्यातील या घटनेचा संदर्भ देत महाराष्ट्र शासनाच्या वतीने लाभार्थ्यांकडून लाभ परत घेतला जात आहे अशा आशयाचे चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले जात असून, अशा चुकीच्या माहितीला आपण बळी पडू नये ही नम्र विनंती. अशाप्रकारे कोणतीही सरसकट अर्जाची फेरछाननी सुरू नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच महिला सक्षमीकरणासाठी अधिक जोमाने काम करण्यास महाराष्ट्र शासन आणि महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील शंका दूर झाल्या आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. महिलांना आर्थिक मदत देणे आहे, असा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेत 21 ते 60 वर्षे वयाच्या महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ दिला जातो. तसेच या योजनेत पात्र होण्यासाठी सरकारने काही निकष ठेवले आहेत. सरकारने ठरवून दिलेल्या निकषांत बसत असलेल्याच महिला या योजनेसाठी पात्र आहेत. दरम्यान, लाडकी बहीण या योजनेचा राज्यातील दोन कोटींहून अधिक महिलांनी लाभ घेतला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना आतापर्यंत 6 हप्त्यांचे पैसे देण्यात आले आहेत. तसेच येत्या काळात देखील या योजनेतील पात्र महिलांना लाभ मिळणार असल्याची ग्वाही सरकारकडून वेळोवेळी देण्यात आली आहे.