सातारा, 03 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.03) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील त्यांच्या जन्मघराला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सावित्रीबाई आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन केले आणि त्यांच्या विचारांना उजाळा दिला. या प्रसंगी विविध माजी मंत्री छगन भुजबळ, राजकीय नेते, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी, आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सावित्रीबाईंच्या जीवनावर आधारित नाटके, कविसंमेलने आणि भाषणांचे कार्यक्रम यांचा समावेश आहे.
https://x.com/CMOMaharashtra/status/1875117014806880627?t=Hh4daLwbYUAtlR5x3fLPeA&s=19
मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनकार्याचा गौरव करत त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि स्त्री-सक्षमीकरणातील महत्त्वपूर्ण योगदानाचा उल्लेख केला. “क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 194 व्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी मी आज याठिकाणी आलो आहे. सावित्रीबाईंना ज्या मातीने घडविले, त्या मातीचे दर्शन घेण्याची संधी मला मिळाली. या मातीने मला देखील एक वेगळी ऊर्जा दिली. त्यामुळे मी नायगावच्या मातीला मनापासून वंदन करतो”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
सावित्रीबाई फुले: शिक्षणाची क्रांतीज्योती
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले यांनी समाजातील महिलांना शिक्षण आणि समानतेचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांचे पती महात्मा ज्योतिबा फुले यांच्यासोबत ऐतिहासिक कार्य केले. 1848 साली पुण्यात त्यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केली. त्यानंतर सावित्रीबाई यांच्यावर तत्कालीन समाजाने टीका केली, परंतु त्यांनी अपमान आणि प्रतिकूल परिस्थितीतही आपले कार्य सुरूच ठेवले. त्या केवळ शिक्षिका नव्हत्या तर समाजातील विधवा, दलित, आणि वंचित महिलांसाठी आवाज बनल्या. त्यांनी बालविवाह विरोधी आणि विधवा विवाह प्रोत्साहनासाठीही काम केले. पुण्यात त्यांनी ‘सत्यशोधक समाज’ च्या माध्यमातून सामाजिक सुधारणा घडवून आणल्या. आज सावित्रीबाईंचे विचार आणि कार्य हे शिक्षण, समानता, आणि सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांचे कार्य पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.