मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी

मुंबई, 28 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. ही धमकी मुंबई ट्रॅफिक पोलिसांना पाकिस्तानी नंबर वरून व्हाट्सॲप द्वारे मिळाली आहे. या संदेशात धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची ओळख मलिक शाहबाज हुमायून रझा अशी सांगितली आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांत तातडीने गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, याप्रकरणाचा तपास सध्या केला जात आहे. याची माहिती मुंबई पोलिसांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे.

https://x.com/ANI/status/1895385219789885836?t=fCJkyJDfd9ufNeHwghXfGw&s=19

यापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदेंनाही धमकी

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांना धमक्या मिळण्याचे प्रकार वाढले आहेत. याआधी 21 फेब्रुवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातून दोन जणांना अटक केली होती. या दोघांनी उपमुख्यमंत्र्यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची धमकी ईमेलद्वारे दिली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्र्यांना धमकी मिळाल्याने पोलिसांनी सुरक्षाव्यवस्था अधिक कडक केली आहे.

धमकी प्रकरणाचा तपास सुरू

दरम्यान, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अशाप्रकारे धमकी मिळणे ही अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तर या धमकीचा आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटनांशी काही संबंध आहे का? याचीही चौकशी सध्या सुरू आहे. याआधीही पाकिस्तानस्थित काही दहशतवादी गटांनी भारतातील नेत्यांना धमक्या देण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यामुळे ही धमकी केवळ एखाद्या व्यक्तीचा खोडसाळपणा आहे की यात मोठे षड्यंत्र आहे? याचा शोध घेतला जात आहे. त्यानुसार, मुंबई सायबर क्राईम विभाग आणि गुप्तचर यंत्रणा मिळालेल्या क्रमांकाचा आणि संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीचा सखोल तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *