पुणे, 11 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस पडला आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. राज्यातील हे ढगाळ वातावरण आजपासून निवळणार असून, येत्या 4 ते 5 दिवसांत आकाश सर्वत्र निरभ्र राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. याची माहिती हवामान विभागाचे अधिकारी अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.
https://twitter.com/anupamkashyapi/status/1745357484297003377?s=19
पुढील 2 दिवस धुके पडणार!
राज्यात आजपासून ढगाळ वातावरण निवळण्यास सुरूवात होईल. तसेच पुढील चार-पाच दिवस हवामान कोरडे राहील. सोबतच येत्या 48 तासांत राज्यातील तुरळक ठिकाणी धुके पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. राज्यात येत्या 4 ते 5 दिवसांत आकाश मुख्यतः निरभ्र राहिल्यामुळे तसेच उत्तरेकडून हवा येण्यामुळे किमान तापमानात घट आणि कमाल तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे राज्यावर आलेले अवकाळी पावसाचे संकट आता दूर झाले आहे.
पुण्यातील हवामान कसे असेल?
याशिवाय पुण्यात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुण्यात पुढील 48 तासांत धुके पडण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसांत म्हणजे, येत्या 15 जानेवारीपर्यंत पुण्यात किमान तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसने घट, तर कमाल तापमानात 4 ते 5 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.