बदलापूर, 23 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) बदलापूर येथील शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेच्या निषेधार्थ पक्षांची महाविकास आघाडीने येत्या 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये राज्यातील जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे. बदलापूर घटनेबाबत राज्य सरकारकडून कारवाईला दिरंगाई होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली आहे.
https://x.com/ANI/status/1826183611462377596?s=19
नाना पटोले यांची प्रतिक्रिया
दरम्यान, बदलापूर येथील ही शाळा भाजप आणि आरएसएसशी संबंधित असलेल्या व्यक्तीच्या मालकीची असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच शाळेचे नाव खराब होऊ नये म्हणून हे प्रकरण दडपण्याचा सरकारकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात होता. सोबतच या शाळेने हे प्रकरण दबाण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज गायब केले, असे आरोप देखील नाना पटोले यांनी केले आहेत. त्यामुळे या पीडित कुटुंबांना सरकारच्या दबावामुळे पोलीस प्रशासनाने त्रास दिला असल्याचे नाना पटोले म्हणाले. बदलापूरमध्ये झालेला प्रकार अत्यंत संतापजनक व माणुसकीला काळीमा फासणारा आहे. राज्य सरकारने या प्रकरणी कारवाई करण्यात जी दिरंगाई केली याचा आम्ही निषेध करतो. या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीच्या वतीने येत्या 24 ऑगस्ट रोजी बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये महाविकास आघाडीमधील सर्व पक्ष सामील होणार आहेत. तसेच या बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे.
कोणत्या सेवांवर परिणाम होऊ शकतो?
येत्या 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदचा राज्यातील सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेल्वे सेवा आणि बस सेवा विस्कळित होऊ शकते. याचा खाजगी कार्यालयांत काम करणाऱ्यांना याचा फटका बसू शकतो. या बंदमुळे दुकाने आणि बाजारपेठा बंद राहण्याची शक्यता आहे. मात्र, या बंद बाबत राज्य सरकारने अद्याप कोणतीही अधिसूचना काढलेली नाही. दरम्यान, 24 ऑगस्ट रोजी बंदची हाक दिली असली तरीही अत्यावश्यक सुविधा सुरूच राहणार आहेत. यामध्ये राज्यातील सर्व रुग्णालये, मेडिकल स्टोअर्स सूरू राहणार आहेत. तसेच सरकारी कार्यालयांना या बंदचा फटका बसणार नाही.
https://x.com/ANI/status/1825874436693832123?s=19
आरोपीला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी
बदलापूर येथील एका शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. त्यामुळे या दोन्ही मुली शाळेत जाण्यास घाबरू लागल्या. त्यानंतर मुलींच्या पालकांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तक्रार करण्यासाठी गेल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यासाठी 11 तासांपेक्षा जास्त वेळ घेतल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबीयांनी केला. याप्रकरणी पोलिसांनी 17 ऑगस्ट रोजी या शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा या शाळेत कंत्राटी पद्धतीने शाळेत काम करीत होता. स्थानिक न्यायालयाने बुधवारी त्याची पोलीस कोठडी 26 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या आंदोलकांकडून 20 ऑगस्ट रोजी बदलापूर रेल्वे स्थानकावर तब्बल 10 तास रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले होते.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1825846330171814341?s=19
एसआयटी समिती स्थापन
या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूर येथील या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी समिती गठित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच त्यांनी यावेळी दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत.