मुंबई, 4 ऑक्टोबरः कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) च्या माध्यमातून करण्यात येणार्या पद भरतीवर काही प्रमाणात पायबंद घातला होता. मात्र, आता संबंधित निर्बंध पूर्ण हटविण्यात आले आहेत. या बाबतच शासन निर्णय वित्त विभागाने नुकताच जाहीर केला आहे. त्यामुळे एमपीएससीमार्फत 100 टक्के पद भरतीचा मार्ग मोकळा झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
राज्य शासनाच्या वित्त विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, ज्या प्रशासकीय विभागांनी वित्त विभागाच्या 11 फेब्रुवारी 2016 च्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे सुधारित आकृतीबंध अंतिम मंजुर केले आहेत. त्या प्रशासकीय विभागांना सुधारित आकृतीबंधातील एमपीएससीच्या कक्षेतील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 100 टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे. तसेच अन्य संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त असलेली पदे 50 टक्के भरण्यास अनुमती देण्यात येत आहे. या प्रमाणानुसार पद भरतीसाठी एकही पद उपलब्ध होत नसेल तर, किमान एक पद भरता येईल.
महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त 102 विद्यार्थ्यांना शालेय ड्रेसचे वाटप
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक उपाययोजनांतर्गत निर्बंध लागू झाल्यानंतरच्या कालावधीत, मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने निर्माण केलेली पदे व अपर मुख्य सचिव (सेवा), सामान्य प्रशासन विभाग व प्रधान सचिव(व्यय), वित्त विभाग यांच्या उपसमितीने पदभरतीस मान्यता दिलेली रिक्त पदे 100 टक्के भरण्यास मुभा देण्यात येत आहे. त्यामुळे यापुढील काळात स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
पुणे स्टेशनवर मोठी दुर्घटना; उच्च दाब विद्युत तारेला तरुणाचा स्पर्श
माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, सरळसेवेची 7 लाख 80 हजार 523 आणि पदोन्नतीची 3 लाख 18 हजार 581 पदे अशी एकूण 10 लाख 99 हजार 104 पदे मंजुर आहेत. यातील सरळसेवेची 6 लाख 39 हजार 194 आणि पदोन्नतीची 2 लाख 59 हजार 717 अशी एकूण 8 लाख 98 हजार 911 पदे भरलेली आहेत. तर सरळसेवेची 1 लाख 41 हजार 329 रिक्तच आहेत. त्यामुळे येत्या काळात संबंधित पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र दिसत आहे.
एमपीएससी अंतर्गत येणार्या सरळसेवा पद भरती 100 टक्के होणार, असा शासन निर्णय आल्यामुळे अनेक वर्षांपासून परीक्षांची वाट पाहणार्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. कोरोना काळात दोन वर्ष गेल्यामुळे राज्यातील पदभरतीला खीळ बसली होती. आता 100 टक्के पदभरती होणार असल्यामुळे विद्यार्थी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाल्याचे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे यांनी सांगितले.