पुणे, 27 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरात गुरुवारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे पुण्यातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. यामध्ये पुण्यातील एकता नगर, सिंहगड रोड, संचायनी पुलाजवळील पाटील इस्टेट, फुलपची वाडी यांसारख्या भागांतील घरात आणि दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले होते. ही परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या पथकाला याठिकाणी पाचारण केले. यावेळी त्यांनी पाण्यात अडकलेल्या अनेक नागरिकांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी आणले. दरम्यान, पुण्यात कालपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. त्यामुळे अनेक भागांत साचलेले पाणी ओसरले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सूचना
अशा परिस्थितीत पुराचे पाणी साचलेल्या पुणे शहरातील अनेक घरे आणि दुकानांमध्ये चिखल, गाळ आणि कचरा मोठ्या प्रमाणात जमा झाला आहे. त्यामुळे याठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच या घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा भागांत स्वच्छता मोहीम राबविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी साफसफाई करणाऱ्या खासगी कंपन्याच्या मदतीने याठिकाणी युद्धपातळीवर स्वच्छता मोहिम राबवावी. तसेच येथे औषधांची फवारणी करावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
नुकसानीचा पंचनामा करण्याचे निर्देश
तसेच, या पुराच्या पाण्यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यातील अनेक घरे, दुकाने तसेच शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात सूचना देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी पुण्यातील पूरस्थितीचा आढावा घेतला, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी यांसारख्या सूचना दिल्या आहेत.