मुंबई, 03 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मुंबईतील धारावी टी जंक्शन येथे संपूर्ण स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ करण्यात आला. ही स्वच्छता मोहीम बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहे. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नालेसफाई कामाची पाहणी केली आणि स्वच्छता कामगारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विविध सूचना दिल्या. यावेळी मुंबईचे पालकमंत्री तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरु असलेली बृहन्मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण स्वच्छता मोहीम…#CleanMumbai#GreenMumbai pic.twitter.com/jRXOquVn6Y
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 3, 2023
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेदरम्यान संबंधित भागातील सर्व रस्ते आणि गल्ल्या स्वच्छ करण्यात येणार आहेत. तसेच ज्या रस्त्यांवर धूळ साचली आहे, असे रस्ते फायरेक्स, डिस्लडिंग किंवा पाण्याचा टँकर वापरून धुतले जातील आणि रस्त्यावर पाणी साचू नये, यासाठी एकाच वेळी ब्रशिंग केले जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत सार्वजनिक शौचालये पूर्णपणे स्वच्छ व निर्जंतुक करण्यात येणार आहेत. तसेच सबंधित भागाच्या कानाकोपऱ्यात साचलेला कचरा आणि राडारोडा स्वच्छ केला जाईल.
या स्वच्छता मोहिमेदरम्यान सबंधित परिसरात कीटकनाशक विभागामार्फत परिसरात रासायनिक औषधांची फवारणी करण्यात येणार आहे. त्यामुळे संसर्गजन्य रोगांना प्रतिबंध करण्यास मदत होईल. याशिवाय सबंधित परिसरातील उद्याने आणि खेळाच्या मैदानांची संपूर्णपणे स्वच्छता केली जाईल. केबल्स, वायर यांचे जाळे हटवणे, सार्वजनिक भिंतींची स्वच्छता यांसारखी अनेक कामे देखील या मोहिमेतून केली जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर!
तसेच यावेळी सबंधित परिसरातील अतिक्रमण, अनधिकृत फेरीवाले, विनापरवाना जाहिरात फलकांवर प्रशासनाच्या वतीने कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर या स्वच्छता मोहिमेत लोकप्रतिनिधी, ख्यातनाम व्यक्ती, विद्यार्थी, सामाजिक संस्था, नागरी संघटना आदींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.
अजित पवारांच्या गौप्यस्फोटावर शरद पवार यांचे स्पष्टीकरण
दरम्यान, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या शुभारंभापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लोकमान्य टिळक रुग्णालयाला भेट देऊन तेथील वैद्यकीय सेवेचा आढावा घेतला. तसेच त्यांनी यावेळी ट्रॉमा केअर तसेच सामान्य कक्षातील रुग्णांची विचारपूस करून औषधोपचाराची माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधला. सोबतच त्यांनी रुग्णालयाच्या स्वयंपाकगृहाला भेट देऊन तेथील अन्नपदार्थांची देखील पाहणी केली.
One Comment on “मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ”