इयत्ता बारावीच्या निकालाची तारीख जाहीर! उद्या दुपारी निकाल पाहता येणार

मुंबई, 20 मे: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. त्यानुसार, यावर्षी झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या दि. 21 मे रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. यासंदर्भातील माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. हा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार असून, तो विद्यार्थ्यांना शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत वेबसाईटवरून पाहता येणार आहे.

दहावीचा निकाल कधी?

दरम्यान, देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण आहे. त्यामुळे दहावी बारावीच्या निकालाला विलंब लागेल की काय? अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र, शिक्षण मंडळाने यंदा वेळेतच निकालाची तारीख जाहीर केली आहे. तर बारावीच्या निकालाची तारीख जाहीर झाल्यामुळे आता इयत्ता दहावीचा कधी लागणार? याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागले आहे.

उद्या निकाल जाहीर

तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या 9 विभागीय मंडळांमार्फत यंदा बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा फेब्रुवारी 2024 ते मार्च 2024 या कालावधीत पार पडली होती. या परीक्षेचा निकाल 21/05/2024 रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे, असे शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे.

विद्यार्थ्यांना या वेबसाईटवर निकाल पाहता येणार

http://www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासोबत निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच http://www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल असे शिक्षण मंडळाने म्हटले आहे.
http://mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
http://www.mahahsscboard.in
https://results.digilocker.gov.in
http://www.tv9marathi.com
http://results.targetpublications.org

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *