मतदानादरम्यान भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल

मुंबई, 21 मे: (विश्वजीत खाटमोडे) लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईत सोमवारी (दि.20) पाचव्या टप्प्यात मतदान पार पडले. या मतदानादरम्यान भाजप आणि काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना मुंबईतील सायन भागातील लिटल एंजल स्कूल येथील मतदान केंद्रावर घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रापासून दूर असलेल्या मतदारांना मतदानाच्या स्लिप दिल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर भाजप कार्यकर्त्यांनी मतदानाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकरणाचा सध्या पोलीस तपास करीत आहेत.

https://twitter.com/ANI/status/1792570189143523775?s=19

हाणामारीप्रकरणी गुन्हा दाखल

यासंदर्भात मुंबई पोलिसांनी सविस्तर माहिती दिली आहे. मुंबईतील सायन परिसरात असलेल्या लिटल एंजल स्कूलमध्ये सुरू असलेल्या मतदानादरम्यान काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. भाजप कार्यकर्त्यांनी असा दावा केला की, काँग्रेस कार्यकर्ते मतदान केंद्रापासून 100 मीटर अंतरावर मतदारांना मतदानाच्या स्लिप देत होते. ज्यावर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला की, मतदानावेळी भाजपचे कार्यकर्ते मतदान केंद्राजवळ जाऊन मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप करत होते. याप्रकरणी सायन पोलिसांनी भाजप कार्यकर्त्याच्या तक्रारीच्या आधारे, भादंवि कलम 506(2) अन्वये दोन अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला असल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

मुंबईत इतके मतदान

तत्पूर्वी, मुंबईत लोकसभा निवडणुकीसाठी 6 जागांवर काल मतदान पार पडले. यामध्ये मुंबई उत्तर मतदारसंघात 55.21 टक्के मतदान झाले. तसेच मुंबई उत्तर मध्य – 51.42 टक्के, मुंबई उत्तर पूर्व – 53.75 टक्के, मुंबई उत्तर पश्चिम – 53.67 टक्के, मुंबई दक्षिण – 47.70 टक्के आणि मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सरासरी 51.88 टक्के इतके मतदान झाले आहे. या मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *