ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याच्या व्हिडिओबाबत राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

मुंबई, 25 मे: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात यंदा 5 टप्प्यात लोकसभेची निवडणूक पार पडली. राज्यातील निवडणुकीची प्रक्रिया आता समाप्त झाली आहे. यादरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याचे काही व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओ संदर्भात राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आलेले प्रसारित केले जाणारे हे व्हिडिओ जुने असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच या व्हिडिओचा यंदाच्या लोकसभा निवडणुकीशी काही संबंध नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

https://www.facebook.com/share/p/EdZw1vKNgMKmDeJm/?mibextid=oFDknk

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने काय म्हटले?

“मतदान प्रक्रिया बाधित होत आहे, असे दाखवणारे आणि ईव्हीएममध्ये छेडछाडीचा प्रयत्न होत असल्याचे दाखवणारे इतर राज्यांमधील काही जुने व्हिडिओ समाज माध्यमांद्वारे प्रसारित केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. असे व्हिडिओ महाराष्ट्र राज्यातील लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 शी संबंधित नाहीत. राज्यातील मतदान प्रक्रिया ही संपूर्णपणे शांततेत आणि सुरळीत झालेली आहे,” असे ट्विट राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने केले आहे.

राज्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण

दरम्यान राज्यात यंदाची लोकसभा 5 टप्प्यात पार पडली. महाराष्ट्रात एकूण 48 जागांवर 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या दिवशी मतदान झाले. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला आहे. या निवडणुकीचा निकाल 7 मे रोजी जाहीर होणार आहे. या निवडणुकीत राज्यातील जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे ह्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *