नागरिकांनी नियमांचे उल्लंघन न करता नववर्षाचे स्वागत करावे, मुंबई पोलिसांचे आवाहन

मुंबई, 31 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) नागरिकांना नववर्षाचे स्वागत सुरक्षितपणे करता यावे, म्हणून मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. नववर्षाचे स्वागत करीत असताना मुंबईतील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी येत्या काही दिवसांत मुंबईत अनेक नियम आणि निर्बंध लागू केले आहेत. या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.



नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 5 जानेवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदीचा आदेश पोलिसांनी दिला आहे. त्यानूसार, पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या कोणत्याही संमेलनास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच मिरवणूक काढणे, मिरवणुकीत लाऊडस्पीकर, कोणत्याही प्रकारची वाद्ये आणि फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर विवाह समारंभ, अंत्यविधी, सामाजिक आणि राजकीय कार्यक्रम यांना या नियमातून वगळण्यात आले आहे.

तसेच बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येत्या 18 जानेवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत पॅराग्लाइडर्स, रिमोट कंट्रोल्ड मायक्रोलाइट एअरक्राफ्ट, ड्रोन, पॅरा मोटर्स, हॅण्ड ग्लायडर्स हॉट एअर बलून या वस्तू उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. तर या आदेशाचे उल्लंघन केल्यास कलम 144 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.



यासोबतच मुंबईत येत्या 9 जानेवारी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र वाहतूक करणे आणि शस्त्र बाळगण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर सरकारी नोकरीतील व्यक्ती, खासगी सुरक्षा रक्षक, चौकीदार आणि गुरखा यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे. याशिवाय मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आजुबाजूच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात उंच उडणारे फटाके उडवणे, प्रकाश उत्सर्जित करणाऱ्या वस्तू सोडणे, पतंग उडवणे आणि लेझर बीम प्रकाशित करणे, फुगे, पॅराग्लायडर्स उडविण्यावर 20 फेब्रुवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. कोणत्याही विमानाच्या लॅंडीग किंवा टेक ऑफ मध्ये अडथळा येऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

https://twitter.com/MumbaiPolice/status/1741420321385914506?s=19

तसेच मुंबईत 31 जानेवारीपर्यंत पेट्रोलियम क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे फटाके, रॉकेट्स उडविणे किंवा फेकण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करत असताना या आदेशाचे पालन करावे, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे. दरम्यान, नागरिकांना नववर्षाचे स्वागत सुरक्षितपणे करता यावे, म्हणून मुंबई पोलीस दलाकडून 22 पोलीस उप आयुक्त, 45 सहायक पोलीस आयुक्त, 2,051 पोलीस अधिकारी, 11,500 पोलीस अंमलदार तसेच एसआरपीएफ प्लाटून , क्यूआरटी. टीम, आरसीपी, होमगार्ड बंदोबस्थासाठी तैनात करण्यात आले आहेत. तरी सर्व नागरिकांनी नियमांचे उल्लंघन न करता नववर्षाचे स्वागत उत्साहाने व जल्लोषात साजरे करावे असे आवाहन बृहन्मुंबई पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *