नाताळ म्हणजे पुनरुत्थानाचा प्रारंभ

जगातल्या 180 पेक्षा जास्त देशांमध्ये 25 डिसेंबर रोजी मोठ्या जल्लोशात व आनंदात ख्रिसमस साजरा केला जातो. हा उत्सव जरी विविध देशांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जात असला तरी, या उत्सवातून प्रभू येशू हे अखिल मानवाच्या उद्धारासाठीच अवतरले होते, हे मात्र नक्की. म्हणूनच प्रभूवर आपली प्रीती दाखविण्याची एकमेव संधी म्हणजे ख्रिसमस होय.

ख्रिसमस म्हटले की, शुभ संदेश, कॅरल, ख्रिसमस नाटिका, ख्रिसमस नृत्य / गायन या पारंपारिक उत्सवाने ख्रिसमस साजरा केला जातो, ख्रिसमस हा खऱ्या अर्थाने प्रभू येशुंना स्मरण करण्याचा दिवस, त्यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई, त्यानंतर ख्रिसमस ट्री, संताक्लॉज यांचे मुख्य आकर्षण झाले आहे.

ख्रिसमस पूर्व संध्या म्हणजेच 24 डिसेंबरच्या मध्यरात्री जगाचा तारणहार प्रभू येशुंचा जन्म झाला. यालाच आपण ख्रिस्तजन्मोत्सव किंवा ‘नाताळ सण’ असे म्हणतो. नाताळ म्हणजे केवळ येशूचा जन्मदिन नाही, तर तारणाची सुरुवात याच दिवशी झाली आहे. जगाच्या तारणासाठी प्रभू येशुंनी आपला प्राण अर्पण केला. येशूच्या रक्तानं तारणाचं दार उघडलं. कारण त्याला स्वतःला मानवरुपी देहाच्या सर्व यातना सहन कराव्या लागल्या आहेत, स्वतःला अनेक कर्मठ, आणि मानवतेलाही न सहन होणारे भोग, सहन करावे लागले, तेव्हा कुठे, आपल्याला ख्रिसमस पहायला मिळत आहे. ते सर्व प्रभू येशूने भोगले, आपण अनेक शतकानुशतके ख्रिसमस साजरा करत आहोत. पण या ‘ख्रिसमस’ साजरा करण्याच्या उद्देशाला आपण समजून घेतले आहे का ? …. हा सण साजरा का करावा ? हे सहजासहजी मनात येणारे प्रश्न आहेत.

अवैध हातभट्टी दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

भारत देश हा विविध धर्म, जाती, भाषा, वेशभूषेने अश्या विविधतेने नटलेला देश आहे. येथे प्रत्येक व्यक्ती हा आपले संस्कार आणि संस्कृतीची जोपासना करताना दिसतो आहे. याला ख्रिस्ती धर्मही अपवाद नाही. ‘ख्रिसमस’ हा ख्रिस्ती धर्मात महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. ‘ख्रिसमस’ हा सण आनंदाचा, उत्साहाचा सण म्हणून उत्सवात साजरा केला जातो. डिसेंबर जवळ आला की आम्ही आपल्या घरादाराची स्वच्छता करतो, रंगरंगोटी करतो. नवीन कपडे आणतो. खाण्यासाठी फराळाचे विविध प्रकार बनवितो व आपला आनंद व्यक्त करतो. अश्या विविध प्रकारे पवित्र धार्मिक सण साजरा करतो. या सणामध्ये प्रामुख्याने पाच गोष्टी महत्वाच्या आहेत 1) प्रीती 2) शिस्त 3) सुंदरता 4) शांतता 5) स्वच्छता, याच आपल्या गोष्टी आदर्श बनू शकतात. देव आपल्या जीवनात अनेक आनंदाचे प्रसंग देतो. आर्थिक, सामाजिक, वैयक्तिक, मानसिक स्थेर्य देतो, म्हणूनच आपण सर्वांनी देवाने आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव करण्याचा दिवस म्हणजे ख्रिसमस होय, मात्र याच जाणीवेचा, आज माझ्या समाज बांधवांना विसर पडला आहे.

दाविदाच्या नगरात, आमच्यासाठी उद्धारक म्हणजेच, देवाचा पुत्र जन्मला. तो आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे, पापापासून पुण्याकडे, वाईटापासून चांगुलपणाकडे, मृत्यू कडून जीवनाकडे त्याचबरोबर एकमेकांबरोबर स्नेहभाव-बंधुभाव, प्रेम-दया क्षमा-शांती निर्माण करण्यासाठी येशू या जगात आला, व त्याने आम्हाला क्षमा शिकवली. त्याने आम्हांला प्रीती शिकविली, त्याने आम्हांला एकमेकावर दया करण्यास शिकवली या त्याच्या शिकवणीला आपण विसरलो आहे का ? असाही प्रश्न पडला आहे. प्रभू येशूने प्रथम आमच्या पापाची क्षमा केली. आमच्या उद्धारकाने क्षमेविषयी केवळ शिक्षण दिले नाही तर क्षमेचे भव्यदिव्य व प्रत्यक्ष दर्शन आम्हाला घडवले. देव क्षमा करणारा आहे, त्याची प्रचिती पवित्र शास्त्रात ठिकठिकाणी येते. जे दयाळू ते धन्य, कारण त्याच्यावर दया होईल, असे येशू म्हणत असे. जर आम्ही दुसर्‍यांना क्षमा केली तर देवपिता आम्हाला पण क्षमा करील व आमच्यावर त्याची दया होईल. प्रभू येशुंच्या उपदेशा नुसार, ख्रिस्त संतांची अशी शिकवण आहे की,…क्षमा कर ! देव क्षमाशील आहे. क्षमा ही परमेश्वराने आमच्यासाठी दिलेली देणगी आहे. तो देवपुत्र असतानादेखील आमच्याबरोबर तो सदैव असतो.

तब्बल 35 वर्षांनी मिटला रस्त्याचा वाद!

आपण ख्रिसमस हा आनंदाचे प्रतीक, आनंदाचा सण म्हणून साजरा करतो. ख्रिसमस हा बाह्य सजावटीसाठी नाही, असे मला वाटते. तर खरा ख्रिसमस हा आध्यात्मिक आहे. प्रभूच्या भक्तीत आहे ख्रिसमस म्हणजे दु:खी लोकांचे अश्रू पुसण्याचा क्षण, कष्टकरी लोकांचे ओझे हलके करण्याचा सण, रंजल्या-गांजल्यांना दिलासा देण्याचा सण. याच गोष्टी प्रभूला अपेक्षित आहेत, तो आपल्यामध्ये आहे. आणि तो आपले कर्म पाहत आहे. हा विश्वास आपण ख्रिसमसच्या माध्यमातून जोपासला पाहिजे, कारण ख्रिसमस म्हणजेच पुनरुत्थानाचा प्रारंभ होय. जर आम्ही पापापासून पुंण्याकडे, अंधारातून प्रकाशाकडे, मरणातून जीवनाकडे, नरकातून स्वर्गाकडे वाटचाल करत आहोत, म्हणजेच आत्म्याच्या प्रेरणेने आम्ही चालत आहोत, तरच आम्ही खर्‍या अर्थाने प्रभू येशूचा स्वीकार केला आहे. आमचे शरीर हे देवाचे मंदिर आहे. तर तो आमच्या जीवनाचा चालक-पालक आहे. गव्हाणीतले बालक म्हणून ख्रिस्ताला पाहायचे नाही, तर तो आमच्या अंत:करणात आहे. हाच खरा ख्रिसमस.

चला तर मग आपण, आपल्या अंत:करणातील ख्रिस्त जगाला दाखवू. येशूच्या आध्यात्मिक ज्ञानाने ज्योतीने ज्योत पेटवू, दिव्याने दिवा पेटवू आणि खऱ्या अर्थाने ख्रिसमस साजरा करू ! या ख्रिसमसला आपण प्रभू येशुंच्या भक्तीने आणि स्मरणाने जिवनाचे सोने करू !
मि. सुशील राज राठोड
बारामती
मो.नं.- 9923216295

2 Comments on “नाताळ म्हणजे पुनरुत्थानाचा प्रारंभ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *