बारामती, 24 ऑगस्टः बारामती शहर पोलीस स्टेशनला डोर्लेवाडी येथील संत सावतामाळी इंग्लिश मीडियम स्कूल पावर्ड बाय लीडच्या एचकेजीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमातंर्गत 23 ऑगस्ट 2022 रोजी भेट दिली. या भेटी दरम्यान, विद्यार्थ्यांनी लहान वयातच पोलिसांच्या कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गादर्शनात पोलीस उपनिरीक्षक टंकसाळे यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनच्या कामकाजाबाबत माहिती दिली.
लहान मुलांना पकडणारी टोळी सक्रिय, ही अफवाच!
यावेळी पोलीस उपनिरीक्षक टंकसाळे यांनी या चिमुकल्यांना पोलिसांबद्दल भिती वाटू नये, यासाठी अगदी सुरुवातीलाच खाऊचे वाटप केले. यानंतर विद्यार्थ्यांची मानसिकता लक्षात घेऊन स्टेशनमध्ये असणारे विभाग आणि समाजात कायदा – सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस कर्मचारी करत असलेले कामकाजाबद्दल चिमुकल्यांना त्यांना समजेल अशा भाषेत माहिती दिली.
यावेळी पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी विद्यार्थ्यांना शक्तीपेक्षा युक्ती कशी सरस असते, हे समजावून सांगण्यासाठी जंगलात चोरांच्या तावडीत सापडलेल्या विद्यार्थ्यांची गोष्ट समजावून सांगितली.
यावेळी संस्थेचे विश्वस्त अभिजित निंबाळकर, वर्गशिक्षिका सोनाली सूर्यवंशी, ज्ञानेश्वरी राऊत यांच्यासह बस चालक बापुराव खरात, आशिष कांबळे आणि मामा उपस्थित होते.