मुंबई, 02 मे: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये ‘मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर, 1 मे रोजी या कक्षांचे उद्घाटन संबंधित जिल्ह्यांतील पालकमंत्री, मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले आहे. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
https://www.facebook.com/share/p/1Be4gkrVPb/
निर्णयाची अंमलबजावणी झाली
गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत मिळणारी आर्थिक मदत सुलभ, पारदर्शक आणि वेळेत उपलब्ध व्हावी, या हेतूने राज्य सरकारच्या वतीने या कक्षांची संकल्पना मांडण्यात आली आहे. 22 फेब्रुवारी 2025 रोजी या संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला होता, तर 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी स्पष्ट व ठोस निर्देश देण्यात आले होते.
या सहाय्यता कक्षांद्वारे रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांना मदतीसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, पात्रता निकष, अर्जाची सद्यस्थिती, तसेच अधिकृत रुग्णालयांची यादी एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे मंत्रालयात वारंवार जावे लागण्याची गरज भासत नाही आणि नागरिकांचा वेळ व खर्च वाचतो.
रुग्णांना फायदा होणार
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी स्पष्ट केले की, “ही योजना राज्यातील गरजू रुग्णांसाठी एक महत्त्वाची आशा ठरणार असून, शासनाच्या लोकाभिमुख आणि प्रभावी आरोग्यसेवा धोरणाची ही प्रकर्षाने जाणीव करून देणारी पायरी ठरेल.” या उपक्रमाच्या अंमलबजावणीतून राज्य सरकारने आरोग्य क्षेत्रात अधिक समावेशक व सुलभ सेवा पुरवण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पावले उचलल्याचे स्पष्ट होत आहे.