मुंबई, 07 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) बांगलादेशात सध्या अशांततेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि मायदेशात त्यांच्या परतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. बांगलादेशमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना तातडीची मदत उपलब्ध करावी. तसेच त्यांना भारतात आणण्यासाठीच्या आवश्यक कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता ठोस पावले उचलली आहेत.
https://x.com/CMOMaharashtra/status/1820826175733702856?s=19
परराष्ट्र मंत्रालयासोबत चर्चा
त्यानुसार, मुख्यमंत्री शिंदे यांनी आता देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाशी संवाद साधला आहे. बांगलादेशातील परिस्थितीचे गांभीर्य पाहता तातडीने कार्यवाही करण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तसेच या ठिकाणच्या प्रभावित विद्यार्थ्यांना सर्व शक्य मदत करण्याची विनंती त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे केली आहे. या विद्यार्थ्यांची सुरक्षितता तातडीने सुनिश्चित करावी. सोबतच बांगलादेशात असलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे बांगलादेशातील सुरक्षित ठिकाणी त्यांचे स्थलांतर करावे. तसेच तेथे अडकलेल्या राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे लवकरात लवकर मायदेशात आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालयासोबत सविस्तर चर्चा केली. त्यामुळे हे सर्व विद्यार्थी लवकरच सुखरूप भारतात पोहोचतील.
बांगलादेशातील परिस्थिती अजूनही वाईट
दरम्यान, बांगलादेशातील परिस्थिती सध्या हाताबाहेर गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून बांगलादेशात आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध आंदोलने सुरू होती. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यामुळे बांग्लादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडू लागल्या. परंतु, त्यानंतर ही परिस्थिती तेथील सरकारच्या हाताबाहेर गेली. त्यामुळे शेख हसीना यांना बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला. तसेच त्यांना आपला देशही सोडावा लागला. सध्या शेख हसीना या भारतात आश्रयाला आल्या आहेत. दरम्यान, बांगलादेशातील हिंसाचारात आतापर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. तेथील हिंसाचार थोडा कमी होताना दिसत आहे, परंतु बांगलादेशातील परिस्थिती अजूनही बिकट आहे.