पालघर, 14 जून: (विश्वजीत खाटमोडे) पालघर जिल्ह्यातील ससूनघर गावातील वर्सोवा खाडी जवळ सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पात बोगदा खोदकाम सुरू असताना माती आणि भिंत कोसळल्याने जेसीबी ऑपरेटर जेसीबी सकट ढिगाऱ्याखाली गाडाला गेला. ही घटना 29 मे रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती. तेंव्हापासून या ऑपरेटरचा शोध घेतला जात आहे. तर त्याचा शोध घेण्यास बचाव पथकाला अद्याप यश आलेले नाही. राकेश यादव असे या जेसीबी ऑपरेटरचे नाव आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्सोवा येथील दुर्घटनेची प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. याप्रसंगी शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम, एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा प्रशासनातील अधिकारी, भारतीय नौदल, सैन्यदल, एनडीआरएफ अधिकारी आणि बचाव पथकाचे कर्मचारी उपस्थित होते.
https://twitter.com/mieknathshinde/status/1801543877712838841?s=19
https://twitter.com/mieknathshinde/status/1801539841211175191?s=19
बचावकार्याला वेग देण्याचे निर्देश
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सैन्यदल, कोस्टगार्ड, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या मदतीने करण्यात येणाऱ्या बचावकार्याला वेग देण्याचे निर्देश दिले आहेत. “वर्सोवा खाडीनजीक सुरू असलेल्या पाईपलाईनच्या कामासाठी खणलेल्या बोगद्यात जमीन खचून संरक्षण भिंत कोसळल्याने जेसीबी ऑपरेटर राकेश यादव त्यात जेसीबीसकट गाडाला गेला. त्याला बाहेर काढण्यासाठीच्या मदतकार्याला आता वेग दिला असून सैन्यदल, कोस्टगार्ड यांच्या मदतीने हे बचावकार्य सूरु करण्यात आले आहे. यात या दुर्घटनाग्रस्त व्यक्तीला बाहेर काढण्याला प्राधान्य देण्यात येणार आहे,” असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
https://twitter.com/mieknathshinde/status/1801539947276701827?s=19
पीडिताच्या कुटुंबीयांना मदत दिली जाणार
तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राकेश यादव यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. घडलेली दुर्घटना दुर्दैवी असून सरकार आपल्या सोबत असल्याची ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी राकेश यादव यांच्या कुटुंबीयांना दिली. सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राकेश यादव यांच्या कुटूंबियांना 50 लाख रुपयांची आर्थिक मदत आणि कुटूंबातील एका सदस्याला एलअँडटी कंपनीत नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच राकेश यादव यांच्या मुलांना देखील आवश्यक ते सहकार्य कंपनीच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.