सगेसोयरे अधिसूचनेवर 6 लाख हरकती आल्याने घाई गडबडीत निर्णय घेता येणार नाही, मुख्यमंत्री शिंदे यांचे स्पष्टीकरण

मुंबई, 20 फेब्रुवारीः (विश्वजीत खाटमोडे) मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देण्यासंदर्भातील विधेयक आज विधानसभेत मंजूर करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगेसोयरे अधिसूचनेवर स्पष्टीकरण दिले आहे. सगेसोयरे अधिसूचनेवर आतापर्यंत 6 लाख हरकती आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. त्यामुळे या हरकतींवर प्रक्रिया आणि छाननी करून सगेसोयरे अधिसूचनेवर निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1759864971163283565?s=19

घाई गडबडीत निर्णय घेता येणार नाही!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी मनोज जरांगे पाटील यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. सगेसोयरे अधिसूचनेवर आतापर्यंत 6 लाख हरकती आल्या आहेत. त्यामुळे घाई गडबडीत कोणत्याही अधिसूचनेवर निर्णय घेणे हे जनतेच्या हिताचे नाही. असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. आम्ही मराठा समाजाची फसवणूक करणार नाही. या हरकतींवर पूर्ण प्रक्रिया आणि छाननी करून सगेसोयरे अधिसूचनेवर सरकार योग्य तो निर्णय घेईल, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी संयम राखला पाहिजे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

आंदोलनकर्त्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा: मुख्यमंत्री

समाज आणि सरकार हे आम्ही वेगळे मानत नाही, ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे. ज्यांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन केले, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले. ज्यांनी मालमत्तेचे नुकसान केले आहे. ज्यांनी कोणाला इजा केली आहे, त्यांच्यावरील गुन्ह्यांचे आम्ही वर्गीकरण केले आहे. आम्ही जे जे बोललो ते सरकारने केलेले आहे. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी देखील सरकारवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. तसेच संयम बाळगण्याची देखील आवश्यकता आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. दरम्यान, कुणबी प्रमाणपत्र संदर्भातील सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे सध्या उपोषण सुरू आहे. तर अधिसूचनेची अंमलबजावणीवर जरांगे पाटील ठाम आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *