गडचिरोली, 15 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गडचिरोली जिल्ह्याच्या अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागातील पिपली बुर्गी येथे भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी येथील पोलीस आणि स्थानिक आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. गडचिरोली पोलीस दलाने आयोजित केलेल्या महा जनजागरण मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी जवान आणि आदिवासी बांधवांशी संवाद साधला. यावेळी महिला पोलीस अंमलदार व स्थानिक महिला भगिनींनी मुख्यमंत्र्यांचे औक्षण करुन भाऊबीज साजरी केली.
बाबर आझमने पाकिस्तानच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते एटापल्ली उपविभागातील नवनिर्मित पिपली बुर्गी पोलीस ठाण्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच पोलीस अंमलदारांसाठी बॅरेक आणि अधिकारी विश्रामगृहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलीस ठाण्याच्या कामकाजाची पाहणी केली. याशिवाय गडचिरोलीच्या पिपली बुर्गी येथे महा जनजागरण मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते स्थानिक आदिवासी बांधवांना खाद्य पदार्थांसह विविध जीवनावश्यक भेटवस्तू आणि साहित्यांचे वाटप करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सायकल, शालेय, क्रीडा साहित्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी गडचिरोली पोलीस दलाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच त्यांनी पोलीस जवानांना शुभेच्छा दिल्या. “आपले पोलीस, जवान हे घरापासून दूर राहून देशाचे, राज्याचे रक्षण न डगमगता, धैर्याने करीत असतात. येथील विशेष अभियान पथक अतिशय सक्षम आणि शूर अधिकारी-कर्मचाऱ्यांचे पथक असून केंद्रीयस्तरावर देखील गडचिरोली पोलीस दलाचे नाव कौतुकाने घेतले जाते”, या शब्दांत मुख्यमंत्र्यांनी पोलीस दलाचे कौतुक केले.
विराट कोहलीचे 50 वे शतक; सचिनचा विक्रम मोडला
“गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात, यातून जिल्ह्यातील आदिवासी बांधवांचा विकास होण्यास मदत होत आहे. गडचिरोलीचा विकास हा सरकारचा ध्यास असून, नवीन उद्योग आता गडचिरोलीत येत आहेत. शालेय साहित्य, सायकली मिळालेल्या विद्यार्थ्यांनी अजून पुढे जिद्द, चिकाटीने शिकून यशस्वी व्हावे.” असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला गडचिरोलीचे जिल्हाधिकारी संजय मीना, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, सहायक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, केंद्रीय राखीव दल 192 बटालियनचे कमांडंट परविंदर सिंह, अपर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
One Comment on “मुख्यमंत्री शिंदेंनी गडचिरोलीतील अतिदुर्गम भागात दिवाळी साजरी केली”