मुंबई, 20 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यापुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1847687327549690271?t=kEVJA5hHpSfSaE1_HXS5gg&s=19
आदिती तटकरे यांची पोस्ट
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र भगिनींना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट, आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र भगिनींच्या खात्यात जमा केला आहे. तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र भगिनींना देण्यात आला आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून, या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता भगिनींनी बळी पडू नये ही नम्र विनंती!” असे आदिती तटकरे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
अजित पवारांचे स्पष्टीकरण
तसेच यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना बंद होणार नसल्याचे म्हटले आहे. “या राज्याचा उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री या नात्याने अतिशय जबाबदारीने सांगतो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नाही. माझ्या भगिनींना, मायमाऊलींना विनंती आहे की, विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये.” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
आतापर्यंत 7500 रुपयांचा लाभ मिळाला
दरम्यान, राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील 21 ते 65 वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला प्रत्येकी 1500 रुपयांचा लाभ दिला जातो. ही योजना जुलै महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. या योजनेत आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या 5 महिन्यांचे 7500 रुपये राज्यातील 2 कोटींहून अधिक महिलांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. तर डिसेंबर महिन्यातील 1500 रुपयांचा लाभ डिसेंबर महिन्यातच मिळणार आहे.