मुंबई, 11 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात महत्वाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांच्या बँक खात्यात येत्या 17 ऑगस्ट रोजी जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे एकूण 3000 हजार रुपये जमा करण्यात येतील, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील भाडणे गावातील महिला सक्षमीकरण मेळाव्यात बोलत होते.
https://x.com/CMOMaharashtra/status/1822284756161053051?s=19
17 तारखेला पैसे जमा होणार
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे राज्यातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत. त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. येत्या 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या बॅंक खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरित करण्यात येतील. यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाचवेळी 3 महिन्यांचे साडेचार हजार रूपये दिले जाणार आहेत,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
https://x.com/iAditiTatkare/status/1822523259700535390?s=19
1.45 कोटींहून अधिक अर्ज आले
दरम्यान, राज्य सरकारने लागू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला सध्या राज्यातील महिलांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या योजनेसाठी आतापर्यंत राज्यातील एकूण 1 कोटी 45 लाख 76 हजार 091 महिलांनी आपला अर्ज दाखल केला आहे. त्यापैकी 1 कोटी 34 लाख 30 हजार 784 महिलांचे अर्ज पात्र झाले आहेत. सध्या या अर्जांची छाननी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. दरम्यान, या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत 31 ऑगस्ट पर्यंत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरता यावा, यासाठी राज्य सरकारने नारीशक्ती दूत आणि एक स्वतंत्र वेबसाईट सुरू केली आहे. यांच्या माध्यमातून महिलांना ऑनलाईन पद्धतीने त्यांचा अर्ज भरता येणार आहे.