मुंबई, 02 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयाच्या माध्यमातून एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मराठी भाषेत भरलेले अर्ज रद्द होणार असल्याचे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर, राज्यभरात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे आपला अर्ज बाद होणार का? असा प्रश्न राज्यातील महिलांना पडला होता. यासंदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी मराठी भाषेत भरलेले अर्ज रद्द होणार नाहीत, अशी ग्वाही आदिती तटकरे यांनी यावेळी दिली आहे.
https://x.com/iAditiTatkare/status/1818695610679316828?s=19
आदिती तटकरे यांनी काय म्हटले?
त्यामुळे राज्यातील महिला भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे. “बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयामधून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या परिपत्रकात मराठी भाषेमधील अर्ज रद्द करण्याची चुकीची बाब नमूद केली आहे. या संदर्भात तहसीलदार, जिल्हाधिकारी व विभागीय अधिकाऱ्यांना निर्देश दिले असून, अशा कोणत्याही अटी मुळे अर्ज रद्द करणार नसल्याची ग्वाही देते,” असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.
https://x.com/iAditiTatkare/status/1818637628259938381?s=19
एक कोटींहून अधिक अर्ज दाखल
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत महिला व बालविकास विभागाकडे 1 कोटी हून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. दरम्यान, राज्य सरकार पात्र अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या बँक खात्यात 1 रुपया जमा करणार आहे. हा 1 रुपया सन्मान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा भाग असेल. तेव्हा यासंदर्भात माता भगिनींनी कोणत्याही प्रकारच्या अपप्रचाराला व गैरसमजाला बळी पडू नये, असे आवाहन देखील आदिती तटकरे यांनी यावेळी दिली आहे.