मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली मुंबईतील दरडप्रवण भागाला भेट

मुंबई, 26 जून: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील घाटकोपर परिसरातील असल्फा व्हिलेज येथील दरडी असलेल्या भागाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असल्फा व्हिलेज परिसरातील हनुमान टेकडी आणि जांभळी पाडा या ठिकाणांना भेट देऊन येथील दरडप्रवण भागाची पाहणी केली. दरड प्रवण क्षेत्र मुक्त करण्याचा राज्य सरकारचा संकल्प असून, त्या दिशेने काम करण्यास सुरूवात असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. तसेच मुंबईतील धोकादायक इमारतींचा सर्व्हे सुरू असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. याप्रसंगी आमदार दिलीप लांडे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

https://x.com/mieknathshinde/status/1805939607592423649?s=19

संरक्षण जाळी बसवण्याचे काम सुरू

तत्पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील 31 दरडप्रवण क्षेत्र संरक्षक जाळी लावून संरक्षित करण्याचे आदेश मॉन्सूनपूर्व आढावा बैठकीत दिले होते. त्यानुसार, असल्फा व्हिलेज येथील हनुमान टेकडी येथे पहिली संरक्षण जाळी बसवण्याचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरच पुर्ण होणार आहे. या कामाची पाहणी आज मुख्यमंत्री शिंदे यांनी केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी ह्या कामाच्या बाबतीत स्थानिक नागरिकांची संवाद साधला. स्थानिकांनी या कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

मुंबई दरडप्रवण मुक्त करण्याचा संकल्प

दरम्यान, राज्यात सध्या पावसाचे वातावरण आहे. दरवर्षी पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. अशा घटनांमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. पावसाळ्यात मुंबईतील डोंगराच्या शेजारी असलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना दरड कोसळण्याचा धोका आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबईतील अशा 31 दरडप्रवण क्षेत्रात संरक्षक जाळी लावून हा परिसर संरक्षित करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात दरड कोसळण्याच्या घटनांना आळा बसेल आणि मुंबईकरांना मोठा दिलासा मिळेल. तसेच राज्य सरकारचा मुंबई दरड प्रवण क्षेत्र मुक्त करण्याचा संकल्प आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *