मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेतला

मुंबई, 22 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात कोरोनाचा जेएन-वन व्हेरिएंट आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. यावेळी त्यांनी आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा घेतला आहे. राज्याच्या आरोग्य यंत्रणा संपूर्णपणे सज्ज असून जनतेने घाबरण्याचे कारण नाही. आगामी सण, नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले आहे. या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांसोबत वैद्यकीय आणि विविध अधिकारी उपस्थित होते. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1737839993958347119?s=19


राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल, विद्युत आणि अग्निशमन यंत्रणांचे ऑडिट करण्यात यावे. त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेडस् आदी यंत्रणा सज्ज ठेवावी, असे निर्देश देतानाच नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. तसेच राज्यातील ऑक्सिजन प्लांट्स, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पाईपलाईन्स, आरटीपीसीआर लॅब, डयुरा, लिक्विड ऑक्सिजन प्लांट या सर्व बाबी सुस्थितीत आहेत का? याची तपासणी करावी. तसेच ते योग्य पद्धतीने कार्यान्वित आहेत की नाही? याची खात्री करावी. सोबतच लसीकरणाचा आढावा घ्यावा. ज्यांचे लसीकरण झालेले नाही त्यांची माहिती घ्यावी व लसीकरण करण्याच्या दृष्टीने तयारी ठेवावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1737844991916208544?s=19



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशाने याआधी देखील कोविडच्या संकटाचा धीरोदात्तपणे यशस्वी मुकाबला केला आहे. संपूर्ण जगाने त्याबाबतीत आपल्या देशाचे अनुकरण केले. मागील अनुभवाच्या आधारे आताही राज्यातील आरोग्य यंत्रणा संपूर्णपणे सज्ज असून जनतेने घाबरण्याचे कारण नाही. नागरिकांनी सर्दी, खोकला, ताप यासारखी लक्षणे दिसल्यास तात्काळ तपासणी करुन घ्यावी. आगामी सण, वर्षाअखेर व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क् वापरावा. आपल्यामुळे इतरांना संसर्ग होणार यासाठी काळजी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी नागरिकांना केले आहे.

https://twitter.com/CMOMaharashtra/status/1737846059752390700?s=19

याशिवाय सोशल मीडियावरून तसेच प्रसारमाध्यमांनी देखील या नव्या व्हेरिएंट संदर्भात चुकीच्या बातम्या प्रसारित होणार नाहीत याची दक्षता घेणे, जेणेकरून लोकांमध्ये संभ्रम वा घबराट निर्माण होणार नाही, अफवा पसरणार नाही. माहिती प्रसारीत करताना अधिकृत माहितीचाच उपयोग करावा, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांना केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *