मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील आणि मुंबईतील पावसाचा घेतला आढावा

मुंबई, 08 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईसह राज्यातील अनेक भागांत सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थिती आणि अतिवृष्टीचा मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेतला. तसेच त्यांनी यावेळी मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात जाऊन शहरातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या.

https://x.com/mybmc/status/1810242907796062381?s=19

https://x.com/CMOMaharashtra/status/1810219224683417786?s=19

मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

कोकण आणि मुंबईसह उपनगरात अतिवृष्टीमुळे जागोजागी पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यासाठी स्थानिक महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी देखील गरजेच्या ठिकाणी तातडीने मदत पोहोचवण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर एनडीआरएफ, एसडीआरएफच्या पथकांना पाचारण करावे, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पावसामुळे मुंबईतील कोणते रस्ते बाधित झाले आहेत? याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतली. शहरातील वाहतूक चालू रहावी. ज्या सखल भागात पाणी साचले आहे तिथे पंप लावून पाणी काढून टाकावे. जिथे रेल्वे सेवा बाधित झाली आहे, त्याठिकाणी बेस्ट बसेसची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा प्रकारचे निर्देश यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले. तसेच शहरातील आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

https://x.com/mieknathshinde/status/1810238802155421724?s=19

मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन

मुंबईत सर्वत्र मुसळधार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे मार्गावरील वाहतूकही बाधित झाली आहे. ट्रॅकवरील पाणी काढण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू असून, लवकरच वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व आपत्कालीन यंत्रणांना हाय अलर्टवर राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यामुळे गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. तसेच मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले.

पालिकेकडून प्रवाशांना खाद्यपदार्थ

दरम्यान, मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडून देखील सातत्याने शहरातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. अतिमुसळधार पावसामुळे मुंबईतील उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत झाली. परिणामी, विविध रेल्वे स्थानकांवर अडकून पडलेल्या प्रवाशांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पाणी, चहा, बिस्कीट व इतर खाद्यपदार्थ पुरवण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *