पुणे, 05 ऑगस्ट: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहर आणि परिसरातील रविवारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे खडकवासला, मुळशी, पवना यांसारख्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली. यामध्ये पुण्यातील एकता नगर आणि आदर्श नगर परिसरात गेल्या काही दिवसांत दुसऱ्यांदा पाणी साचले आहे. यासोबतच सिंहगड रोड परिसर, इंद्रानगर, शांतीनगर झोपडपट्टी, पुलाची वाडी, चिमा गार्डन, दत्तवाडी, बोपोडी, वारजे, जुनी सांगवी, पाटील इस्टेट आणि कर्वेनगर यांसारख्या विविध भागांतील नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले आहे.
https://x.com/ANI/status/1820399648319946781?s=19
पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलवले
अशा परिस्थितीत एनडीआरएफ, अग्निशमन दल, लष्कराचे जवान, पीएमआरडीए चे पथक यांनी बचावकार्यात पूरग्रस्त भागांतील अनेक नागरिकांची सुटका करून त्यांना सुरक्षितस्थळी हलविले आहे. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.05) पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. यावेळी त्यांनी येथील पूरग्रस्त भागाच्या झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
नागरिकांशी साधला संवाद
यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शाळा, पाटील इस्टेट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय, वाकडेवाडी येथील पीएमसी कॉलनी या पूरग्रस्त भागांतील नागरिकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांनी यावेळी या समस्या सोडवण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. पूरबाधित नागरिकांना शासनाच्यावतीने सर्व सहकार्य करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
https://x.com/Info_Pune/status/1820404957511643448?s=19
पूरग्रस्तांना मदत साहित्याचे वाटप
सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी पूरग्रस्त भागातील लोकांना भेटून मदत साहित्याचे वाटप केले. पुराचा धोका कायस्वरुपी दूर करण्यासाठी तसेच पूरपरिस्थितीच्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने नवीन धोरण आणण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरग्रस्त नागरिकांना दिले आहे.