मुंबई, 26 मे: (विश्वजीत खाटमोडे) पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईचे काम सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. यावेळी टक्केवारीवर आधारित नव्हे तर नाल्याची संपूर्ण सफाई करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वडाळा येथील जे.के नाला, चुनाभट्टी येथील ए.टी.आय नाला, वांद्रे कुर्ला संकुलातील मिठी नदीचे पात्र, जोगेश्वरी पूर्व येथील मजास नाला तसेच दहिसर नदी येथे सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
https://twitter.com/mieknathshinde/status/1794665857903362356?s=19
https://twitter.com/mieknathshinde/status/1794666784802611358?s=19
मुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्यांना सुचना
या पावसाळ्यात मुंबई शहरात पाणी साचू नये, यासाठी सखल भागात सक्शन पंप तसेच भरतीच्या वेळी पाणी साठवण्यासाठी 13 साठवण टाक्या तयार केल्या आहेत. या टाक्यांमध्ये 7 कोटी लीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. मिठी नदीमध्ये दूषित पाणी येऊ नये, यासाठी एसटीपी प्लांट उभारून समुद्रात देखील दूषित पाणी जाणार नाही, याची काळजी घेण्यात येणार आहे. येत्या काही वर्षात ही यंत्रणा कार्यान्वित होणार आहे. शहरात दरड पडण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी जाळी लावून तो भाग संरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याठिकाणी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार नाल्याच्या बाजूला राहणाऱ्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे निर्देश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर पाणी साचू नये तसेच नाल्यातील पाणी प्रवाही रहावं यासाठी संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
याप्रसंगी आमदार मंगेश कुडाळकर, आमदार रवींद्र वायकर, माजी मंत्री दीपक सावंत, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे, अभिजित बांगर, शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे, माजी नगरसेवक कमलेश राय यांच्यासह मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी आणि स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.