मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना लागू! पहा योजनेची सविस्तर माहिती

मुंबई, 26 जुलैः (विश्वजीत खाटमोडे) काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प जाहीर करताना शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज या योजनेची घोषणा केली होती. या योजनेचा फायदा राज्यातील 44 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी राज्य सरकार 14 हजार 760 कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. या योजनेचा जीआर राज्य सरकारने नुकताच प्रसिद्ध केला आहे. दरम्यान, ही वीज कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे? ही योजना किती दिवसांसाठी असणार आहे? या यांसारख्या अनेक गोष्टींची माहिती आपणास पुढे वाचता येईल.

योजनेचा उद्देश

भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून आहे. याची आपल्याला जाणीव आहे. मात्र गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होत आहे. या बदलत्या हवामानाचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील शेतकरी बांधव अडचणीत आला आहे. अशा शेतकऱ्यांना सध्या मदतीच्या हाताची गरज आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना’ आणली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी दि. 28 जून 2024 रोजी राज्याच्या अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची घोषणा केली आहे.

योजनेची संपूर्ण माहिती –

राज्यातील 7.5 एच.पी पर्यंतचे शेती पंप असणारे सर्व शेतकरी हे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज या योजनेस पात्र असणार आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज मिळणार आहे. तर या योजनेचा कालावधी एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत म्हणजेच 5 वर्षांचा असणार आहे. परंतु, 3 वर्षानंतर राज्य सरकारकडून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर ही योजना पुढील कालावधीत सुरू ठेवण्यासंदर्भांत निर्णय घेण्यात येईल, असे राज्य सरकारने त्यांच्या शासन निर्णयात म्हटले आहे. दरम्यान, या योजनेत राज्यातील शेतकऱ्यांच्या 7.5 अश्वशक्ती क्षमतेपर्यतच्या शेतीपंपांना एप्रिल 2024 पासून पूर्णतः मोफत वीज पुरवली जाणार आहे. याचा लाभ राज्यातील 44 लाख 3 हजार शेतकऱ्यांना होणार आहे. मात्र, 7.5 एचपीपेक्षा जास्त क्षेमतेचे शेतीपंप शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *