मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ प्रकरण; ठाकरे गटाच्या नेत्याला जामीन मंजूर

मुंबई, 01 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) ठाकरे गटाचे नेते आणि माजी महापौर दत्ता दळवी यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि काही शर्तींसह जामीन मिळाला आहे. मुलूंड कोर्टाने हा निर्णय दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर सभेत शिवीगाळ केल्याप्रकरणी दत्ता दळवी यांना गेल्या 2 दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. याप्रकरणी त्यांच्या विरोधात अनेक कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला होता. तेंव्हापासून ते तुरूंगात होते. आज अखेर त्यांची कारागृहातून सुटका झाली आहे.

शरद पवारांच्या राजीनाम्याविषयी अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट

तत्पूर्वी, दत्ता दळवी यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. यावेळी मुंबईच्या मुलुंड कोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या जामीनाला विरोध केला होता. मात्र, दत्ता दळवी यांच्या वकिलांनी कोर्टात जोरदार युक्तिवाद केल्यामुळे अखेर त्यांना जामीन मिळाला. यावेळी कोर्टाने त्यांना काही अटींचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करू नये, असे कोर्टाने म्हटले आहे. तसेच त्यांनी प्रक्षोभक वक्तव्य करणे टाळावे आणि पोलिसांना सहकार्य करावे यांसारख्या विविध सूचना कोर्टाने दिल्या आहेत.

जातीनिहाय जनगणना करण्याची अजित पवारांची मागणी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थानमध्ये गेले होते. त्यावेळी राजस्थान मधील भाजप कार्यकर्त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाच्या पुढे ‘हिंदूहृदयसम्राट’ असे लिहिलेले बॅनर समोर आले होते. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यात आली होती. तर 26 नोव्हेंबर रोजी भांडुपमध्ये ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यातील जाहीर सभेत दत्ता दळवी यांनी ‘हिंदूहृदयसम्राट’ बॅनर वरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल अश्लील शिवीगाळ व अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता आणि त्यांना अटक करण्यात आली होती.

One Comment on “मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ प्रकरण; ठाकरे गटाच्या नेत्याला जामीन मंजूर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *