मुंबई, 08 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील कर्करोगाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपी उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिली आहे. राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. यावेळी विधानसभेत विभागावरील पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर बोलत होत्या.
https://x.com/MeghnaBordikar/status/1897699209442205940?t=itdajnJ5ZeEH47TxZYbFmQ&s=19
राज्यात तसेच देशभरात कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे प्रभावी उपचार सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक बनले आहे. सध्या अनेक कर्करुग्णांना मोठ्या रुग्णालयांमध्ये किंवा खासगी आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी जावे लागते. या उपचारांसाठी मोठा खर्च येतो. त्यामुळे सर्वसामान्यांना सहज उपचार मिळावेत म्हणून आता जिल्हा स्तरावरच केमोथेरपी उपचार दिले जाणार आहेत.
अनेक रुग्णांना फायदा होणार
केमोथेरपी उपचाराची सुविधा सुरू करण्यासाठी जिल्हा रुग्णालयांमध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा, तज्ज्ञ डॉक्टर, औषधे आणि अन्य सोयी-सुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहेत. त्यामुळे ही सुविधा लवकर सुरू व्हावी, अशी सर्वसामान्य जनतेकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या सुविधेमुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील कर्करोगाच्या रुग्णांना मोठा दिलासा मिळेल. त्यांना उपचारांसाठी मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज भासणार नाही आणि उपचाराचा खर्चही कमी होईल. त्यामुळे आता राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये केमोथेरपी सुविधा उपलब्ध झाल्यास अनेक कर्करोगाच्या रुग्णांना याचा मोठा लाभ मिळणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आरोग्य सेवेत मोठी सुधारणा होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.