मुंबई, 13 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर, विविध राजकीय पक्षांच्या नेते राज्यभरात सभा घेताना दिसत आहेत. यादरम्यान, निवडणूक आयोगाच्या पथकांकडून अनेक बड्या राजकीय नेत्यांच्या बॅगांची तपासणी केली जात आहे. यामध्ये, उद्धव ठाकरे, नितिन गडकरी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे यांसारख्या अनेक नेत्यांच्या बॅगा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या या बॅगा तपासण्याच्या निर्णयावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यावरून राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
https://x.com/CEO_Maharashtra/status/1856307370781245896?t=q4Q15CH1CA3VDuPAkeu9Gw&s=19
निवडणूक आयोगाने काय म्हटले?
निवडणूक काळात विविध पक्षांचे मान्यवर नेते व स्टार प्रचारक हवाई मार्गाने दौरे करतात. त्यांच्या हेलिकॉप्टर्स अथवा विमानाची देखील तपासणी केली जाते. अशा प्रकारे सर्वच नागरिकांच्या वाहनांची तपासणी केली जाते व त्यामध्ये राजकीय पक्ष किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अपवाद केला जात नाही, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यामधून स्पष्ट केले आहे. तसेच स्थिर सर्वेक्षण पथक ज्याठिकाणी नेमलेले असते, तेथून जाणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी होते. पथकामध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलसह महसूल व अन्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असतो. अशी तपासणी करताना संशयास्पद काही आढळले नाही, तर नागरिकांना त्रास होणार नाही, याची दक्षता घेतली जाते. असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. संशयास्पदरित्या आढळून आलेला पैसा, दारू, मौल्यवान धातू आणि इतर वस्तू जप्त करुन नियमाप्रमाणे कारवाई केली जाते. सर्वच नागरिकांनी या बाबत सहकार्य करून निष्पक्ष व चांगल्या वातावरणात निवडणुका पार पाडण्यामध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने या प्रसिद्धी पत्रकातून केले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी
तत्पूर्वी, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची दोन वेळा तपासणी केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे संतापल्याचे पहायला मिळाले होते. यावेळी उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना त्यांचे आयकार्ड आणि नियुक्तीपत्र मागितले होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांसारख्या नेत्यांच्या बॅगा तुम्ही तपासता का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना विचारला होता. तसेच त्यांनी याचा व्हिडिओ देखील शूट केला होता. तेंव्हापासून राज्याच्या राजकारणात बॅगा तपासण्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. सध्या यासंदर्भात अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.