‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील पहा 7 महत्त्वाच्या सुधारणा

मुंबई, 04 जुलै: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यास सध्या सुरूवात झाली आहे. या योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. यासाठी राज्य सरकारने 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेसंदर्भातील कागदपत्रे जमवण्यासाठी सरकारी कार्यालयात महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक पात्र महिलेला याचा लाभ मिळावा, यासाठी जिल्हास्तरावर प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.



राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत महत्त्वाचे 7 बदल केलेले आहेत. हे बदल खालीलप्रमाणे:-

1) लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 65 वर्षे करण्यात आला आहे.

2) योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

3) पिवळे व केशरी रेशन कार्ड उपलब्ध असल्यास उत्पन्न दाखला प्रमाणपत्रातून सूट मिळणार आहे.

4) एकाच कुटुंबातील दोन महिलांना लाभ मिळणार आहे. यामध्ये 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला असल्यास दोघींनाही लाभ मिळेल.

5) परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास पतीचा जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

6) योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिवास प्रमाणपत्र नसल्यास 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, जन्मदाखला यापैकी एक ग्राह्य धरण्यात येणार आहे.

7) पाच एकर शेत जमीनीची अट वगळण्यात आली आहे. त्यामुळे किती जरी एकर शेतजमीन असली तरीही संबंधित महिलेला या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *