चारधाम यात्रेला सुरुवात! केदारनाथचे दरवाजे उद्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भाविकांसाठी खुले

उत्तराखंड, 09 मे: (विश्वजीत खाटमोडे) चारधाम यात्रेसाठी देशात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. चारधाम यात्रेला उद्यापासून (दि.10 मे) सुरूवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर, गंगोत्री, यमुनोत्री आणि केदारनाथचे दरवाजे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर म्हणजेच 10 मे रोजी उघडणार आहेत. तर, बद्रीनाथचे दरवाजे भाविकांना दर्शनासाठी 12 मे रोजी खुले होणार आहेत. दरम्यान, चारधाम यात्रेसाठी यंदा देशातील लाखो भाविकांनी नोंदणी केली आहे. चारधाम यात्रेसाठी आतापर्यंत एकूण 22 लाख 661 भाविकांनी आपल्या नावाची नोंदणी केली आहे.

लाखो भाविकांनी केली नोंदणी

यामध्ये यमुनोत्रीसाठी 3 लाख 44 हजार 150 भाविकांनी नोंदणी केली. गंगोत्रीसाठी 3 लाख 91 हजार 812 भाविकांनी नोंदणी केली. तसेच श्री केदारनाथ धामसाठी 7 लाख 60 हजार 254 भाविकांनी नोंदणी केली आहे. श्री बद्रीनाथ धामसाठी 6 लाख 58 हजार 486 भाविकांनी नोंदणी केली आहे. तर हेमकुंड साहिबसाठी 45 हजार 959 भाविकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये श्री केदारनाथ धामची नोंदणी सर्वाधिक आहे. नोंदणीची संख्या लक्षात घेऊन सरकार आणि प्रशासनानेही कंबर कसली आहे. त्यासाठी चारधाम यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. प्रवास व्यवस्थापनासाठी चारही धामांमध्ये टोकन प्रणाली लागू करण्यात येणार आहे. नोंदणीशिवाय कोणताही भाविक चारधाम यात्रा करू शकणार नाही.

अशा पद्धतीने नोंदणी करू शकता

चारधामला भेट देण्यासाठी येणारे भाविक उत्तराखंड पर्यटन विकास परिषदेची वेबसाइट, ॲप, टोल फ्री क्रमांक आणि व्हॉट्सॲपद्वारे नोंदणी करू शकतात. विशेष म्हणजे, मागील वेळेप्रमाणे या वेळीही कोणत्याही धामसाठी यात्रेकरूंची संख्या मर्यादित ठेवण्याची तरतूद नाही. याचा फायदा भाविकांना होणार आहे. दरम्यान, registrationandtouristcare.uk.gov.in या वेबसाईटवरून देखील भाविक चारधाम यात्रेसाठी नोंदणी करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *