राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता; पुण्याला येलो अलर्टचा इशारा

पुणे, 07 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) येत्या काही दिवसांत राज्यात पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. येत्या काही दिवसांत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणात पावसाची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या थंडी कमी झाली आहे.

https://twitter.com/anupamkashyapi/status/1743636619477827700?s=19

हलक्या स्वरूपाचा पाऊस!

आजपासून येत्या 10 जानेवारी रोजी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यानंतर 11 आणि 12 जानेवारी रोजी राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.

पुणे आणि परिसरात येलो अलर्ट

दरम्यान, पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात पुढील 3 दिवस धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच येत्या 8 आणि 9 तारखेला पुणे आणि आसपासच्या परिसरात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात येलो अलर्टचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

तापमानात घट होण्याचा अंदाज 

तसेच पुणे आणि परिसरात आजपासून पुढील 2 दिवस तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. 10 तारखेला तुरळक ठिकाणी भुरभुर पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय 8 तारखेनंतर पुणे आणि आसपासच्या परिसरात किमान तापमानात 3 ते 4 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमानात आजपासून 10 तारखेपर्यंत 3 ते 4 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *