मुंबई, 04 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) फेंगल चक्रीवादळाचा तडाखा देशातील दक्षिणेकडील राज्यांना बसला आहे. फेंगल चक्रीवादळामुळे सध्या महाराष्ट्राच्या हवामानात देखील परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात कडाक्याची थंडी पडली होती. परंतु, आता राज्यातील थंडीचे वातावरण गायब झाले आहे. तसेच कालपासून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अशातच हवामान विभागाने येत्या काही दिवसांत राज्यात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर, हवामान विभागाकडून सबंधित जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
https://x.com/SDMAMaharashtra/status/1863864994426966416?t=1n0RnthfuciDk2QaeGobPA&s=19
https://x.com/Hosalikar_KS/status/1863773813827063901?t=wQ1jV4ggRJUubYg-K_WiXQ&s=19
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र
फेंगल चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात पावसाची शक्यता असून राज्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. ढगाळ वातावरण असल्याने सध्या राज्याच्या अनेक भागांतील तापमानात किंचित वाढ झाली आहे. दरम्यान, हवामानाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पाऊस झाला तर त्यामुळे विविध शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या जिल्ह्यांना येलो अलर्ट
पुढील काही दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा इशारा दिला आहे. त्यामुळे हवामान विभागाने सबंधित जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार 4 डिसेंबर रोजी राज्यातील जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच 5 डिसेंबर रोजी पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांना, 6 डिसेंबर रोजी सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.