पुणे, 23 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) गेल्या काही दिवसांपासून राज्यात प्रचंड प्रमाणात थंडी जाणवत आहे. अशातच हवामान विभागाने पुढील काही दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. येत्या 26 आणि 27 डिसेंबर रोजी राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख डॉ. के एस होसाळीकर यांनी यांनी म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर, सबंधित जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येत्या 26 डिसेंबर रोजी राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांना हवामान विभागाने पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. तसेच 27 डिसेंबर रोजी धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
थंडी गायब होणार?
दरम्यान, राज्यात सध्या थंडीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात कमालीची घट झालेली पहायला मिळत आहे. तसेच सकाळी बहुतांश ठिकाणी दाट धुके पडत आहे. परंतु, राज्यातील अनेक ठिकाणी रविवारपासून (दि.22) ढगाळ वातावरण आहे. वातावरणातील या बदलांमुळे राज्यातील तापमानात किंचित वाढ झाली आहे. अशातच हवामान विभागाकडून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील थंडीचा जोर कमी होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.