पुणे, 10 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत राज्यातील विविध भागांत वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राज्यात पावसाचे चित्र पहायला मिळू शकते. दरम्यान, राज्याच्या विविध भागांत सध्या ऑक्टोबर हिट जाणवत आहे. त्यामुळे राज्यात उकड्याचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत पावसाची अपेक्षा केली जात आहे.
https://x.com/Hosalikar_KS/status/1844319288729141579?t=LNGXJpOts_3ZHbdUfbxtrw&s=19
हवामान विभागाची माहिती
तत्पूर्वी, मुंबईच्या अरबी समुद्रात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. येत्या तीन चार दिवसांत हा कमी दाबाचा पट्टा तीव्र होऊन तो आणखी वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांना वादळी वारे आणि ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिली आहे.
या जिल्ह्यांना पावसाचा इशारा
त्यानुसार, गुरूवारी (दि.10) राज्यातील पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, ठाणे, पालघर, नाशिक, अहमदनगर, बीड, धाराशिव, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बुलढाणा, धुळे, जळगाव, नंदुरबार, अमरावती, अकोला, वाशिम, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुढील चार दिवस यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.