मुंबई, 18 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय क्रिकेट संघाच्या 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी शनिवारी (दि.18) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
https://x.com/ANI/status/1880547917813133727?t=ZhD3mVSEiGjkfbtWrLx7lw&s=19
बुमराहची संघात निवड
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला संघात स्थान देण्यात आले आहे. मात्र, त्याचा सहभाग त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल, असे निवड समितीने स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या सामन्यात बुमराहला पाठीच्या दुखापतीमुळे बाहेर जावे लागले होते. त्यामुळे त्याच्या फिटनेसवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
मोहम्मद सिराजला डच्चू
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाचे नेतृत्व कर्णधार रोहित शर्मा सांभाळेल, तर शुभमन गिल उपकर्णधार म्हणून काम पाहील. मोहम्मद शमी 14 महिन्यांच्या ब्रेकनंतर संघात पुनरागमन करत आहे. श्रेयस अय्यरनेही दुखापतीनंतर संघात पुनरागमन केले आहे. फिरकी विभागात रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव या खेळाडूंची निवड झाली आहे. दुसरीकडे, मोहम्मद सिराजला संघातून वगळण्यात आले आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी गट विभागणी
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 8 संघ सहभागी होतील. यामध्ये संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या स्पर्धेत 15 सामने खेळवले जातील. प्रत्येक गटातील संघ तीन सामने खेळतील. गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. यातील अ गटात भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश हे संघ आणि ब गटात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड या संघांचा समावेश करण्यात आला आहे.
स्पर्धेचे ठिकाण व वेळापत्रक
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेला 19 फेब्रुवारीपासून सुरूवात होईल. त्याचा अंतिम सामना 9 मार्चला होणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने चार ठिकाणी खेळवले जातील. पाकिस्तानातील तीन मैदानांवर आणि दुबईतील एका मैदानावर सामने होणार आहेत. यामध्ये भारतीय संघ आपले सर्व सामने दुबईत खेळेल. स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना दुबईत, तर दुसरा लाहोरमध्ये खेळवला जाईल.
भारतीय संघ:- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा आणि केएल राहुल (विकेटकीपर).