दुबई, 20 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या सामन्यात भारताने बांगलादेशचा 6 गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर भारतीय संघाने स्पर्धेची विजयी सुरूवात केली आहे. बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात बांगलादेशने भारतासमोर विजयासाठी 229 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताने हे लक्ष्य 4 गडी गमावून 46.3 षटकांत पूर्ण केले. दरम्यान, या स्पर्धेतील भारताचा पुढील सामना 23 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान सोबत रंगणार आहे.
https://x.com/BCCI/status/1892610485687849365?t=vSLhW96cOoG7mSZVnb6C4A&s=19
बांगलादेशी फलंदाजांची खराब कामगिरी
या सामन्यात बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना 49.4 षटकांत 228 धावा केल्या. तौहीद हृदोयने 118 चेंडूत 100 धावा करत शानदार शतक ठोकले. जाकर अलीने 114 चेंडूत 68 धावा केल्या. तनजीद हसनने 25 धावा केल्या, तर रिशाद हुसेनने 18 धावांचे योगदान दिले. मात्र, सौम्या सरकार, नजमुल हसन शांतो, मुस्तफिजुर रहीम आणि तनझिम हसन साकिब खातेही न उघडता बाद झाले. त्यामुळे बांगलादेश संघाची धावसंख्या कमी झाली. भारताकडून मोहम्मद शमीने उत्कृष्ट गोलंदाजी करत 5 विकेट घेतल्या. हर्षित राणाने 3 विकेट मिळवल्या, तर अक्षर पटेलने 2 गडी बाद केले.
शुभमन गिलचे नाबाद शतक!
भारताने 46.3 षटकांत 4 गडी गमावून 231 धावा करत विजय मिळवला. शुभमन गिलने 129 चेंडूत नाबाद 101 धावा करून सामनावीर पुरस्कार पटकावला. कर्णधार रोहित शर्माने 36 चेंडूत 41 धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. विराट कोहलीने 22, श्रेयस अय्यरने 15 आणि अक्षर पटेलने 8 धावा केल्या. अखेरच्या टप्प्यात गिल आणि केएल राहुलने नाबाद 87 धावांची भागीदारी करत भारताला विजय मिळवून दिला. केएल राहुल 41 धावांवर नाबाद राहिला. तर बांगलादेशकडून रिशाद हुसेनने 2 विकेट घेतल्या, तर तस्किन अहमद आणि मुस्तफिजुर रहमान यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.