छगन भुजबळ यांच्याकडून आव्हाडांची पाठराखण! म्हणाले, टीका करण्यात काहीच अर्थ नाही

मुंबई, 30 मे: (विश्वजीत खाटमोडे) राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या समावेशाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला आहे. त्यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी काल रायगड जिल्ह्यातील महाड येथे मनुस्मृतीचे दहन आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्याकडून मनुस्मृतीच्या पोस्टरवर असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला गेला. या पार्श्वभूमीवर, जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आज राज्यभरात अनेक ठिकाणी आंदोलने केली जात आहेत. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून जाहीर माफी मागितली आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी याबाबत जितेंद्र आव्हाड यांची बाजू घेतली आहे.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1796068947940274349?s=19

छगन भुजबळ काय म्हणाले?

“जितेंद्र आव्हाड एका चांगल्या भावनेने तेथे गेले. मनुस्मृती जाळली पाहिजे ही त्यांची भावना चांगली होती, याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. परंतु चुकून त्यांनी बाबासाहेबांचे पोस्टर असलेले चित्र फाडले. यावेळी त्यांनी काय फाडले ते पण पाहिले नाही. त्यानंतर सगळ्यांनी त्यांचे अनुकरण केले. पण नंतर त्यांनी माफी सुद्धा मागितली. त्यांची भावना लक्षात घेतली पाहिजे. केवळ विरोधी पक्षातील आहेत म्हणून त्यांच्यावर टीका करण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे आम्हाला मनुस्मृतीचे शिक्षणामध्ये चंचुप्रवेश नको आहे, हा मुद्दा दुर होईल आणि फक्त जितेंद्र आव्हाड यांच्यावरच लक्ष केंद्रित होईल,” असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.

https://twitter.com/Awhadspeaks/status/1796061600824349073?s=19

जितेंद्र आव्हाडांनी म्हणाले आभार

दरम्यान, छगन भुजबळ यांनी पाठिंबा दिल्यामुळे जितेंद्र आव्हाडांनी त्यांचे आभार मानले आहेत. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. “भुजबळ साहेब, अनावधानाने काल माझ्याकडून चूक झाली आणि त्या चुकीबद्दल मी कालच जाहीरपणे नतमस्तक होऊन माफी मागितली. आज आपण त्याचा उल्लेख करीत मनुस्मृतीला विरोध केलाच पाहिजे, हा विचार पुढे आणला. मी आपला मनापासून आभारी आहे. मला काल चवदार तळ्यावर, आपल्या मागे इतर पक्षातील कोण उभे राहतील, असा प्रश्न विचारला असता, मी पटकन एकच नाव घेतले, छगन भुजबळसाहेब! आपल्या मनात बहुजन समाजाविषयी असलेले प्रेम अन् आपली भूमिका मला माहित आहे. त्यामुळेच मी इतक्या अधिकाराने मी आपले नाव घेतले. आपण ज्या पद्धतीने माझ्या मागे उभे राहिलात त्याबद्दल मी आपला कायम ऋणी राहीन. मनुस्मृतीविरोधातील आपली लढाई आपण सगळे एकत्रित लढू, हीच आपली सर्वांची भूमिका असली पाहिजे,” असे ते यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *