केंद्र सरकारची खासदारांना खास भेट, पगारासह भत्ते आणि पेन्शनमध्ये वाढ

दिल्ली, 25 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय संसदीय कार्य मंत्रालयाने खासदार आणि माजी खासदारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांच्या वेतन, दैनिक भत्ता, पेन्शन आणि अतिरिक्त पेन्शनमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही नवीन दर 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहेत. संसदीय कामकाज मंत्रालयाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. महागाई निर्देशांकाच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला असून, यापूर्वी 2018 मध्ये वेतन आणि भत्त्यांचा आढावा घेण्यात आला होता.

https://x.com/ANI/status/1904125547007107265?t=zKuwIZqrtNyj1FIOZf-dLw&s=19

24 टक्क्यांची वाढ

नव्या सुधारित निर्णयानुसार, खासदारांचे मासिक वेतन 1 लाख रुपयांवरून 1 लाख 24 हजार रुपये करण्यात आले आहे, म्हणजेच यात 24 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच, त्यांना मिळणारा दैनिक भत्ता 2 हजार रुपयांवरून 2 हजार 500 रुपये करण्यात आला आहे.

पेन्शनमध्ये वाढ

यासोबतच, माजी खासदारांना मिळणाऱ्या मासिक पेन्शनमध्येही सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांची पेन्शन 25 हजार रुपयांवरून 31 हजार रुपये करण्यात आली आहे. याशिवाय, 5 वर्षांहून अधिक कार्यकाळ असलेल्या माजी खासदारांसाठी अतिरिक्त पेन्शन दर वर्षाला 2 हजार रुपयांवरून 2 हजार 500 रुपये करण्यात आली आहे.

आधी 1 लाख पगार होता

2018 मध्ये खासदारांच्या वेतन आणि भत्त्यांबाबत कायद्यात सुधारणा करण्यात आली होती. त्यानुसार, प्रत्येक 5 वर्षांनी वेतन आणि भत्त्यांचा आढावा घेतला जातो. यंदा महागाई दराच्या आधारे संसदीय कार्य मंत्रालयाने ही वाढ जाहीर केली आहे. यापूर्वी, 2018 मध्ये झालेल्या सुधारणेनुसार, खासदारांचा मासिक पगार 1 लाख रुपये निश्चित करण्यात आला होता. हा निर्णय महागाई दर आणि वाढत्या खर्चाचा विचार करून घेण्यात आला, जेणेकरून खासदारांचा पगार बदलत्या आर्थिक परिस्थितीनुसार सुसंगत राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *