नवी दिल्ली, 05 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी उष्माघाताचा सामना करण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक घेतली. यावेळी मनसुख मांडविया म्हणाले की, “उन्हाळा सुरू झाला आहे. भारतीय हवामान विभागाने एल निनोच्या प्रभावामुळे उष्णतेची लाट येण्याची भीती व्यक्त केली असून, यंदा उष्णतेची लाट आणि तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आम्ही बैठक घेऊन राज्य सरकारला मार्गदर्शक सूचना जारी करण्यास सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी प्यावे. तसेच त्यांनी पाणी सोबत ठेवावे, स्वतःला हायड्रेट ठेवावे,” असे आवाहन मनसुख मांडविया यांनी केले आहे.
https://x.com/ANI/status/1775486181398171949
लोकांनी पाणी प्यावे – आरोग्यमंत्री
यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले की, “सध्या अनेकजण लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. सरकारने राज्यांना सल्लागार जारी करण्यास सांगितले आहे. लोकांनी प्रचार करताना पाणी सोबतच ठेवावे. शेतात काम करणारे शेतकरी असोत, मजूर असोत किंवा इतर कामे करणारे असोत, त्यांना माझी सूचना आहे की त्यांनी पाणी सोबत ठेवावे आणि वेळोवेळी ज्यूस घ्यावा. लिंबू पाणी प्यावे. तसेच हंगामी फळांचे सेवन करावे.”
तर जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधा
“आरोग्य विभागाच्या सूचनांनुसार खबरदारी घेतल्यास उष्माघात टाळता येऊ शकतो. आमच्या तज्ज्ञांनी असाही सल्ला दिला आहे की, जर कोणाला उष्माघाताचा त्रास झाला तर, तुम्ही तात्काळ जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधू शकता. सोबतच अधिक गरज असल्यास जिल्हा रुग्णालयाशीही संपर्क साधता येईल,” असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. उष्णतेच्या लाटेत उष्माघात टाळण्यासाठी खबरदारी घेतल्यास त्याचे दुष्परिणाम कमी होऊ शकतात. तसेच मंत्रालयाने यासंदर्भातील सर्व व्यवस्था करण्याच्या सूचना राज्यांना दिल्या असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.