दिल्ली, 07 मे: (विश्वजीत खाटमोडे) केंद्र सरकारने 14,000 टन बिगर बासमती पांढरा तांदूळ मॉरिशसला निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. यासंदर्भातील अधिसूचना परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) जारी केली आहे. देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी सरकारने 20 जुलै 2023 पासून बिगर बासमती पांढऱ्या तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यामध्ये केंद्राने काही देशांमध्ये बिगर बासमती पांढऱ्या तांदळाची निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने यापूर्वी टांझानिया, जिबूती आणि गिनी-बिसाऊसह काही आफ्रिकन देशांमध्ये या श्रेणीतील तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली होती.
भारताने मॉरिशसला १४००० मेट्रिक बिगर-बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यास दिली परवानगी
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) May 7, 2024
परकीय व्यापार महासंचालनालयाने अधिसूचना काढून दिली माहिती#Mauritius pic.twitter.com/ISJ0wE1jUJ
केंद्राकडून अधिसूचना जारी
त्याचबरोबर केंद्राने बासमती नसलेला पांढरा तांदूळ नेपाळ, कॅमेरून, कोटे डी आयव्हरी, गिनी, मलेशिया, फिलीपिन्स आणि सेशेल्स या देशांमध्ये निर्यात करण्यासही परवानगी दिली आहे. तर भारत सरकारने आता मॉरिशसला बिगर बासमती पांढरा तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे मॉरिशस मधील लोकांना आता भारतीय तांदळाचा भात खाण्यास मिळणार आहे. सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हा बदल शनिवार 4 मे पासून लागू झाला आहे.2022-23 या वर्षात भारत जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यातदार देश ठरला होता. मात्र, वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने जुलैमध्ये बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.
भारतीय परराष्ट्र व्यापार महासंचालनालय विभाग सध्या तांदूळ निर्यात धोरणांतर्गत तांदूळ निर्यात करते. त्यानुसार, सध्या ज्या देशांना सरकारने मान्यता दिली आहे, त्या देशांमध्येच तांदूळ निर्यात केला जात आहे. तर बाकीच्या देशांत बिगर बासमती तांदळाची निर्यात करण्यास बंदी आहे.