देशात जेएन-1 व्हेरिएंटचे रुग्ण वाढले

दिल्ली, 27 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) भारतात कोरोनाच्या जेएन-1 या व्हेरिएंटची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या आता 109 वर पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासांत जेएन-1 व्हेरिएंटची लागण झालेले 40 रुग्ण आढळले आहेत. यांतील सर्वाधिक रुग्ण हे गुजरात मधील आहेत. गेल्या 24 तासांत गुजरातमध्ये 36 रुग्णांना जेएन-1 या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची लागण झाली आहे. तर कर्नाटकात या व्हेरिएंटचे रुग्ण 34, गोव्यातून 14, महाराष्ट्रातील 9, केरळमधून 6, राजस्थानमधून 4, तामिळनाडूमधून 4 आणि तेलंगणामधून 2 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचे टेन्शन वाढले आहे.

https://twitter.com/ANI/status/1739907951065006341?s=19

दरम्यान, गेल्या 24 तासांत भारतात कोरोनाचे 529 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशात कोरोना आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या आता 4 हजार 093 इतकी झाली आहे. सध्या या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर देशात गेल्या 24 तासांत 603 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याशिवाय देशात 3 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे केरळ राज्यात आढळले आहेत. केरळमध्ये कालच्या दिवशी 353 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. याबाबतची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.



तर गेल्या 24 तासांत केरळ राज्यात 495 रुग्णांनी कोरोना आजारावर मात केली आहे. केरळ पाठोपाठ कर्नाटकात देखील कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. कर्नाटक येथे गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 74 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 37 नवे रुग्ण आढळले आहेत. तर राज्यातील 11 रुग्ण हे कोरोना आजारातून बरे झाले आहेत. तत्पूर्वी, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालय सतर्क झाले असून यासंदर्भात सध्या उपाययोजना केल्या जात आहेत. तर नागरिकांनी कोरोना संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *